काँग्रेसच्या अस्तित्वासाठी प्रदेश कमिटीची धडपड

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाणार की नाहीत? जाणार तर कधी हा प्रश्‍न महाराष्ट्रात गेले चार-सहा महिने ‘कट्टाप्पाने बाहुबली को क्‍यूँ मारा!’ यापेक्षा जास्त चघळला गेला. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या विषयात तोंड घातले; मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन सोडले नाही. राणे गेलेच तर सिंधुदुर्गात संघटनेचे अस्तित्व टिकवायचे प्रयत्न प्रदेश काँग्रेसने आता सुरू केले आहेत; मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याने त्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे भाजपात जाणार की नाहीत? जाणार तर कधी हा प्रश्‍न महाराष्ट्रात गेले चार-सहा महिने ‘कट्टाप्पाने बाहुबली को क्‍यूँ मारा!’ यापेक्षा जास्त चघळला गेला. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या विषयात तोंड घातले; मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन सोडले नाही. राणे गेलेच तर सिंधुदुर्गात संघटनेचे अस्तित्व टिकवायचे प्रयत्न प्रदेश काँग्रेसने आता सुरू केले आहेत; मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याने त्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.

विधानसभेत पराभव होवूनही सिंधुदुर्गात नारायण राणें यांचे राजकीय वजन कमी झालेले नाही. सिंधुदुर्गात पूर्वी समाजवाद्यांबरोबरच काँग्रेसचेही राजकीय बळ मोठे होते. गावोगावच्या संघटना काँग्रेसच्याच ताब्यात होत्या.

शिवसेनेचा प्रभाव वाढू लागल्यानंतर काँग्रेसची गावागावातील संस्थाने खालसा होऊ लागली. शिवसेनेचा म्हणजे राणेंचा प्रभाव असे समीकरण जिल्ह्यात घट्ट झाले. शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांनीही जिल्ह्यातील संघटना एकहाती राणेंकडे दिली. राणेंच्या पक्षांतरानंतर एकहाती सत्ता दिल्याचा फटका शिवसेनेला बसला. राजकीय वैभवात असलेली ही संघटना अवघ्या काही तासात खाली आली. राणेंनी ही ताकद काँग्रेसला दिल्याने तिसऱ्या नंबरवर असलेला काँग्रेस जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आला.

काँग्रेसनेही शिवसेनेच्याच कार्यपद्धतीचे अनुकरण करत जिल्ह्यातील संघटना राणेंकडे सुपूर्द केली. अर्थात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसाठी दुसरा पर्यायही नव्हता. कारण राणेंनी काँग्रेसमध्ये आल्यानंतर आपल्या आक्रमक शैलीने आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न कुठच्याच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला नाही. हळूहळू राणेंनी काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनाही आपलेसे केले. ज्यांनी हा बदल स्वीकारला नाही ते राजकीय प्रवाहातून बाहेर फेकले गेले. यामुळे जिल्ह्यात आता अस्तित्वात असलेली काँग्रेसची बहुसंख्य संघटना राणेंच्या प्रभावाखालचीच आहे.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर राणे काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. राणेंनी पक्षाविरोधात उघड बंड पुकारल्याची भूमिकाही अनेकदा घेतली; मात्र काँग्रेसने राणेंना वगळून सिंधुदुर्गात काँग्रेसचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे हळूहळू काँग्रेसच्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांनीही राणेंचे नेतृत्व मान्य केले.
आता राणे भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेले काही महिने सुरू आहे.

शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी यावर उघड प्रतिक्रियाही दिल्या. राणेंनीही आपण काँग्रेस सोडणार नाही अशी ठाम भूमिका कधीच जाहीर केली नाही. असे असूनही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन सोडले नाही. आता मात्र प्रदेश काँग्रेस अचानक सक्रीय झाली आहे. चारच दिवसापूर्वी काँग्रेसने निष्ठावंतांची बैठक बोलावली होती. यात राणे आणि त्यांच्या समर्थकांना निमंत्रण नव्हते. राणेंनी त्याचवेळी काँग्रेसची समांतर बैठक बोलावली. राणेंकडील बैठक हाऊसफुल्ल आणि प्रदेशकडून आलेल्या हुसेन दलवाई, राजन भोसले, विश्‍वनाथ पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीला कार्यकर्त्यांचा दुष्काळ असे चित्र होते. प्रदेशकडून आलेल्या या नेत्यांनी राणेंना विश्‍वासात घेतले नसल्याची भूमिका राणेसमर्थकांकडून घेतली. राणेंनीही त्याला पाठींबा
दिला. 

आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांची फौज प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सावंतवाडीत सुरु असलेल्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी प्रदेशच्या या पदाधिकाऱ्यांसह बैठक बोलावणाऱ्या विकास सावंत यांना धारेवर धरले. यावर दलवाई यांनी ‘राणे जिल्ह्यात आहेत हे माहित नसल्याचे सांगून आपणही त्यांना नेता मानतो, अशी 
भूमिका घेतली. 

जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनाच बैठक बोलवायला सांगितली होती; मात्र त्यांनी मनावर न घेतल्याने आपण बैठक बोलावल्याचे प्रदेश सदस्य विकास सावंत यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात उघडरित्या पडलेली ही पहिली ठिणगी म्हणावी लागेल.

आता या वादानंतर प्रदेश काँग्रेस सक्रीय झाली आहे. त्यांनी आहे ही कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी निवडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दलवाईंसह तिन्ही निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशकडे सोपविला आहे. असे असलेतरी काँग्रेसचे वेगळे अस्तित्व आता निर्माण करणे त्यांच्यासाठी सोपे नाही. 

प्रदेश काँग्रेसची जिल्ह्यात कोंडी 
काँग्रेसच्या विद्यमान कार्यकारिणीत बहुसंख्य पदाधिकारी राणेंवर निष्ठा असणारे आहेत. कार्यकर्तेही बऱ्यापैकी प्रमाणात राणेमय झाले आहेत. ग्रामीण भागात काँग्रेसला मानणारे मतदार आणि कार्यकर्ते काही प्रमाणात असलेतरी त्यांचे नेतृत्व कोण करणार हाही प्रश्‍न आहे. कारण राणेंच्या प्रवेशाआधी जिल्हास्तरीय नेतृत्व करणारे बहुसंख्य पदाधिकारी एक तर राणेंचे नेतृत्व मानणारे बनले किंवा प्रवाहातून बाहेर तरी फेकले गेले. यामुळे राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला जिल्ह्यात अस्तित्व राखण्यात कठीण होईल, अशी सद्यस्थिती आहे. अर्थात राणे जाणार की नाही याबाबतची साशंकता कायम आहे. असे असलेतरी राणेंच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रदेश काँग्रेसची जिल्ह्यात कोंडी झाली आहे.

Web Title: sawantwadi kokan news State committee's struggle for existence of Congress