‘जीएसटी’मुळे भजनी वाद्यांच्या किमतीत १५ टक्‍के वाढ

भूषण आरोसकर
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

जीएसटीमुळे १५ टक्के किमतीत जरी फरक पडला असला तरी भजनी मंडळींवर फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. बाजारपेठेत बऱ्यापैकी ग्राहकवर्ग येत आहे. येत्या काही दिवसांत त्यात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
- गुरुनाथ पोकळे, वाद्यवृंद साहित्य विक्रेते.

गणेशचतुर्थीसाठी बाजारपेठा सजल्या; लाकडावरील २८ टक्के जीएसटीचा परिणाम

सावंतवाडी - गणेशचतुर्थीसाठी वाद्यवृंद साहित्याने बाजारपेठा सजल्या असून येथील बाजारपेठेत स्थानिकांसह गोवा कर्नाटकमधून ग्राहक साहित्य खरेदीसाठी दाखल होत आहेत. यातच लाकूड साहित्यावर असलेली २८ टक्के जीएसटी आणि हार्मोनियम साहित्यावर १८ टक्के जीएसटी कर लागू झाल्यामुळे १५ टक्क्‍यांनी साहित्याच्या किमतीत वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेशचतुर्थीच्या खरेदीसाठी लगबग वाढली आहे. भजनी मंडळी साहित्याची जमवाजमव करण्यासाठी दंग झाली आहेत. येथील बाजारपेठेत तबला, पखवाज, मृदुंग, हार्मोनियम, टाळ, झांज, ढोलकी व इतर साहित्य दाखल झाले होते. दरम्यान पखवाज, तबला, मृदुंगासाठी लागणारा कच्चा माल गुजरात, मुंबईहून आणण्यात आला होता. सद्य:स्थितीत येथील बाजारपेठेत हे भजनासाठी लागणाऱ्या नवसाहित्याची निवड करण्यासाठी वाद्य कलेतील निपुण असलेली भजनी मंडळी दाखल होत असल्याचे चित्र आहे.

केंद्रशासनाने विविध साहित्य व वस्तूवर आकारलेली जीएसटी या साहित्याच्या किमतीत वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. असे असले तरी ग्राहकांच्या खरेदीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. लाकूड साहित्यावर २८ टक्के जीएसटी तर हार्मोनियमच्या साहित्यावर १८ टक्के जीएसटी लागल्याचे विक्रेते गुरुनाथ पोकळे यांनी सांगितले. बाजारपेठेत यंदा तबला सोबत तानपुरे असलेले यंत्र नव्याने दाखल झाले आहे. जीएसटीमुळे यंदा बाजरपेठेत साडेचार हजारांपासून सुरवात किमतीचे पखवाज दाखल झाले आहेत. तर सर्वसाधारण नागरिकांनाही परवडणारे असे अत्यंत छोट्या आकाराचे अवघ्या १ फुटी लांबीचे पखवाज दाखल झाले आहेत. साडे आठ हजारापासून किंमतीने हार्मोनियमची विक्री करण्यात येत आहेत. त्यापासून पुढील किंमतीने साहित्याची विक्री होत आहे. तर साडे तीन हजारापासून सुरवातीने तबल्याची विक्री होत आहे. भजनासाठी लागणाऱ्या टाळ व झांजच्या वाद्यानाही वाद्यवृंदकाराकडून मोठी मागणी होत आहे. साडेचारशे रुपयांपासून विविध काशाचे टाळांची विक्री होत आहे. बाजारपेठेत स्थानिकाप्रमाणेच गोव्यातील भागातून, कर्नाटकमधील कारवार, तर रत्नागिरीमधील राजापुर अशा ठिकाणाहून साहित्य खरेदीसाठी नागरीक येत असल्याचे विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे. जीएसटीमुळे १५ टक्के किंमतीत वाढीव फरक पडला असून आरती भजनाच्या आवड असल्याने नागरीकांच्या खरेदीत फरक नसल्याचे सांगण्यात आहे. स्थानिकांचा तर चांगलाच प्रतीसाद असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: sawantwadi konkan news bhajan instrument rate 15% increase by GST