‘फूड सिक्‍युरिटी’चा सिंधुदुर्गात प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सावंतवाडी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी केरळच्या धर्तीवर याठिकाणी फूड सिक्‍युरिटी आर्मी हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेतून आवश्‍यक तो निधी देऊन यंत्राच्या साहाय्याने शेती करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.

सावंतवाडी - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी केरळच्या धर्तीवर याठिकाणी फूड सिक्‍युरिटी आर्मी हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेतून आवश्‍यक तो निधी देऊन यंत्राच्या साहाय्याने शेती करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिली.

केसरकर येथे दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले ‘‘जिल्ह्यातील शेतकरी बळकट करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ज्याप्रमाणे देशात प्रथम केरळमध्ये फूड सिक्‍युरिटी आर्मी हा प्रयोग राबविण्यात आला. तो प्रयोग आता जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना सधन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्याला यंत्राच्या माध्यमातून नांगरणी, लावणी, कापणी आणि मशागत कशी करावी ही कामे शिकविण्यात येणार आहेत आणि त्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रसामुग्री चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ कशी मिळवून देता येऊ शकते, त्याच बरोबर भविष्यात जिल्ह्याचा शेतकरी यंत्राच्या माध्यमातून शेती करताना दिसणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी स्वीकारल्याने पडीक जमिनीत सुध्दा शेती होण्याबरोबर शेतीचे प्रमाणे निश्‍चितच वाढण्यास मदत होणार आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘मच्छीमारांच्या बळकटीसाठी माझे प्रयत्न आहेत आणि त्यांच्यासाठी सुध्दा विविध उपक्रम राबविण्यासाठी मी प्रयत्नशिल आहे.’’
यावेळी नगरसेविका आनारोजीन लोबो, माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत, कुटीर रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार सतिश कदम, वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, वनक्षेत्रपाल श्री. पाणपट्टे आदी उपस्थित होते.

डीएड, बीएड धारकांचे प्रश्‍न मांडणार...
यावेळी जिल्ह्यातील डीएड, बीएड उमेदवारांनी श्री केसरकर यांची यावेळी भेट घेतली. भरती प्रक्रियेत आम्हाला प्राधान्य द्या, कोकण निवड मंडळाची पुर्नस्थापना करा. तसेच उर्वरीत आमच्या मागण्या मान्य करा, अशा विविध मागण्या उपस्थित उमेदवारांनी केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडल्या. यावेळी तुमच्या मागण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन केसरकर यांनी यावेळी दिले. यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी डीए बीएड संघटनेचे अध्यक्ष भिवसेन मसुरकर, सचिव लखू खरवत, उपाध्यक्ष भाग्यश्री रेवडेकर, खजिनदार मकरंद जैतापकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: sawantwadi konkan news food security experiment