सिंधुदुर्गात पुन्हा अवैध धंद्यांचे पेव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

आशीर्वाद कोणाचा? - जुगार, मटक्‍यासह दारूविक्री जोरात; कारवाईचे आव्हान

सावंतवाडी - जिल्हा पोलिस प्रशासनाने नवे पोलिस अधीक्षक रुजू झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडली; मात्र जिल्हाभर पुन्हा एकदा अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. याला कोणाचे आशीर्वाद आहेत; हे मात्र गूढ आहे.

आशीर्वाद कोणाचा? - जुगार, मटक्‍यासह दारूविक्री जोरात; कारवाईचे आव्हान

सावंतवाडी - जिल्हा पोलिस प्रशासनाने नवे पोलिस अधीक्षक रुजू झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून अवैध धंद्याविरोधात मोहीम उघडली; मात्र जिल्हाभर पुन्हा एकदा अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. याला कोणाचे आशीर्वाद आहेत; हे मात्र गूढ आहे.

जिल्ह्यात दारू, मटका आणि जुगार हे प्रमुख अवैध धंदे चालतात. गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक हा या सगळ्यामधला मोठी आर्थिक उलाढाल असलेला काळा धंदा मानला जातो. पूर्वी अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी याला आळा घालण्याचा प्रयत्न केला. यात पोलिस अधीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्न आणि रवींद्र शिसवे यांची कारकीर्द विशेष लक्षवेधी ठरली. त्यांनी जवळपास सर्व अवैध धंदे हद्दपार केले होते. अलीकडच्या काळात अभिषेक त्रिमुखे यांनी पोलिस यंत्रणेमध्ये आवश्‍यक सुधारणा करून या धंद्यांना चाप लावायचा प्रयत्न केला. मधल्या काळात मात्र हे धंदे फोफावले. प्रसार माध्यमांनी या विरोधात टीकेची झोड उठवूनही काळे धंदे सुसाटच सुरू होते. काही महिन्यांपूर्वी पोलिस अधीक्षक म्हणून दाखल झालेल्या अमोघ गावकर यांनी पुन्हा एकदा या धंद्याविरोधात कडक भूमिका स्वीकारली. विशेषतः या धंद्यांना आशीर्वाद देणाऱ्या खाकीमधीलच शिलेदारांवर कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यातील वाहतूक पोलिस पर्यटकांना त्रास देतात अशी तक्रार खुद्द पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी विविध सभांमध्ये मांडली होती. गावकर यांनी हे उपद्रवमूल्य कमी केले; मात्र त्यांचा कार्यकाल अल्प ठरला.

विद्यमान पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याविरोधात मोहीम जाहीर केली. ज्या पोलिस अधिकाऱ्याच्या क्षेत्रात अवैध धंदे आढळतील त्यांच्यावर कारवाईचा इशाराही दिला. जिल्हाभर छापासत्रही सुरू झाले. अनेक ठिकाणी मटका, अवैध दारूसाठा पकडण्यात आला; मात्र आता ही मोहीम जवळपास थंडावली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पुन्हा अवैध धंद्यांनी तोंड वर काढले आहे.

मटका, काही भागामध्ये जुगार अड्डे, दारू याची स्थिती पूर्वीसारखीच झाल्याचे चित्र आहे. याला आशीर्वाद कोणाचा याबाबत उलटसुलट चर्चा आहे. हप्तेसंस्कृती पुन्हा सुरू झाल्याची चर्चाही या वर्तुळात सुरू झाली आहे. पोलिस अधीक्षक या विरोधात पुन्हा मोहीम उघडून गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णतः हद्दपार करणार का हा प्रश्‍न आहे.

दारूची वाहतूक पुन्हा मूळ पदावर
गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे लाखो रुपयांची दारू ‘पास’ केली जाते. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग करत असतो. अलीकडे राज्य उत्पादनने या प्रकरणी बरेच छापे टाकले. प्रत्यक्षात गोव्यातून जिल्ह्यात प्रवेश करताना प्रत्येक मार्गावर तपासणी नाके आहेत. तेथे पोलिस कार्यरत असतात. सध्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक पुन्हा मूळ पदावर आल्याची चर्चा आहे.

अवैध दारूलाही ‘जीएसटी’चे कारण
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री चालते. खाकीच्या आशीर्वादाशिवाय ही छुपी दुकानदारी चालणे अशक्‍य आहे. मध्यंतरी काही भागात या निर्ढावलेल्या दारू अड्डेवाल्यांनी जीएसटीचे कारण दाखवून अवैध दारूचे दरही वाढविले.

Web Title: sawantwadi konkan news illegal business