सावंतवाडी पालिकेच्या उत्पन्नात वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सावंतवाडी - पालिकेच्या कर विभागाने यावर्षी पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या वसुलीत ९८ टक्‍क्‍यांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात तीन कोटींच्या उत्पन्नाने वाढ झाली आहे, असा दावा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

सावंतवाडी - पालिकेच्या कर विभागाने यावर्षी पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या वसुलीत ९८ टक्‍क्‍यांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात तीन कोटींच्या उत्पन्नाने वाढ झाली आहे, असा दावा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

साळगावकर यांनी आज येथे आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक दीपाली सावंत, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी आदी उपस्थित होते. यावेळी साळगावकर म्हणाले, ‘‘अन्य वर्षाच्या तुलनेत यावर्षी सावंतवाडी पालिकेने पाणीपट्टी आणि घरपट्टीची वसुली करण्यात चांगले यश मिळविले आहे. त्यात घरपट्टीची रक्कम ९२.५६ इतकी झाली असून, १ कोटी ५९ लाख ७१ हजार रुपये इतकी वसूल झाली आहे. पाणीपट्टीचे उद्दिष्ट ९८.२२ इतके पूर्ण झाले आहे. यात उद्दिष्टापैकी १ कोटी ३१ लाख ८६ हजार रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे.’’

मालमत्ता करात शासनाकडुन भरमसाठ वाढ केली होती. त्यामुळे नागरीकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. असे असताना त्यांनी आपल्या लेखी हरकती नोंदवून आपला मालमत्ता कर भरला आहे. दुसरीकडे पालिकेच्या विविध करातून आणखी काही निधी कराच्या स्वरुपात उपलब्ध झाला आहे. यात एक लाख दोन हजार दोनशे रुपये इमले आणि व्यावसायिक वापर,१६ लाख १७ हजार रुपये व्यावसायिक गाळ्यातून आणि २ लाख १७ हजार ६३४ रुपये जमिन भाड्याच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. तर भाजी मार्केटच्या परवाने नुतनीकरण आणि भाड्याच्या माध्यमातून १० लाख ८४ हजार रुपयाचा निधी मिळाला आहे. मटण मार्केटच्या माध्यमातून भाड्यापोटी १२ हजार ७५० रुपये मिळाले आहेत, असे साळगावकर यांनी सांगितले.

वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी काम करणाऱ्या अधिकारी आसावरी शिरोडकर यांच्यासह परविन शेख, दीपक म्हापसेकर, नझीर सय्यद, डुमिंग आल्मेडा यांचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी कौतूक केले. पालिकेकडुन वसुलीसाठ नेमण्यात आलेल्या पथकात गजानन परब, रिझवान शेख, मनिषा शिरोडकर, विनोद सावंत, तानाजी जाधव आदी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांचेही आभार मानले.

...आणि एप्रिल फूल
पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर श्री. साळगावकर यांनी बोलण्यास सुुरवात केली. यावेळी आपण आयुष्यातील मोठा राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष ते काय बोलतात याकडे गेले. उपस्थित सहकाऱ्यांसह पत्रकारांचे चेहरे धीरगंभीर झाल्याचे पाहून मी सर्वांना एप्रिल फूल केले. असा कोणताही राजकीय निर्णय नाही, असे साळगावकर यांनी सांगितले. त्यामुळे उपस्थितांत हशा पिकला.

यापुढे संघर्ष आरोग्य सेवेसाठी... 
यावेळी साळगावकर यांनी आपली भूमिका मांडली. लोकांनी मला खूप प्रेम दिले. आज शंभर टक्के वसुली कर भरून या प्रेमाची पोचपावती दिली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे आपण आभार मानतो, असे त्यांनी सांगितले. यापुढील आपला संघर्ष हा आरोग्यसेवेसाठी असणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

Web Title: sawantwadi konkan news municipal income increase