मूर्तिकारांच्या कामात विजेचे विघ्न

पाडलोस - मूर्ती बनविण्यात मग्न असलेले मूर्तिकार.
पाडलोस - मूर्ती बनविण्यात मग्न असलेले मूर्तिकार.

न्हावेली पंचक्रोशीतील स्थिती - आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण

सावंतवाडी - न्हावेली-पाडलोस भागांत गेल्या चार दिवसांपासून धुमाकूळ घातलेला पाऊस त्यात वीज गुल होण्याचे प्रकार वाढल्याने गणेशमूर्ती बनविण्यात अडसर निर्माण होत आहे. अशातही मूर्तिकारांनी ७५ टक्के काम पूर्ण केले आहे. गणेश चतुर्थी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे तालुक्‍यातील गणपती शाळांमध्ये कमालीची लगबग वाढली आहे; परंतु विजेचा लपंडाव कायम सुरू असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे पाडलोस-केणीवाडा येथील ओेमकार मूर्ती कलाकेंद्र शाळेतील मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.

कोकणातल्या जनतेला वेध लागले ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गणेशमूर्ती शाळा गजबजू लागल्या आहेत; परंतु गेला आठवडाभर पाडलोस परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सायंकाळी ७ वाजले की वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याचा फटका अन्य नागरिकांसह गणेश मूर्तिकारांना बसत आहे. १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवामुळे गोवा, महाराष्ट्रातील गणेश चित्रशाळांमध्ये मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.

सध्या या मूर्तींची मागणी गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, तुळस, बांदा, शेर्ला, मडुरा, रोणापाल, इन्सुली, सातोसे, सातार्डा, कवठणी, आरोंदा, तळवणे, पाडलोस, न्हावेली, सोनुर्ली आदी भागांतून आहे; परंतु जागा अपुरी असल्याने ते जास्त मागण्या घेत नाहीत. गणेशभक्तांना आवडणाऱ्या शाडू मातीच्या मूर्ती शाळेत बनवल्या जातात.

येथील शाळेत अष्टविनायक, लंबोदर, दगडूशेट, कृष्ण अवतार, अंबुजा गणपती, शेषनाग अवतार आदी प्रकारच्या मूर्त्या बनवितात. 

शासनाची कोणतीही मदत नाही, स्वतःची जागा नाही, असे असतानाही आपल्या कलेच्या जीवावर व चिकाटीवर गणेश भक्तांची ते आवड पूर्ण करतात. मूळ गाव आरोस येथील नाना परब यांनी १९८७ पासून म्हणजे ते दहावी असल्यापासून आपले वडिल नामदेव परब यांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्त्या बनविण्याच्या क्षेत्रात त्यांनी रस दाखवला. शासनाने काही प्रमाणात अशा व्यवसायिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या ते श्रीधर परब यांच्या तात्पुरत्या भाडेतत्वावर असलेल्या जागेत मूर्त्या बनवित आहेत. त्यांच्या हातची कला पाहून पंचक्रोशीतील अनेक भक्तगणांचा कल केणीवाडा येथील ओंमकार मूर्ती कला केंद्र शाळेत वाढला आहे.

सिंधुदुर्गत गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी गणेशपूजन केले जात असल्यामुळे गणेशमुर्ती आधीच ठरलेल्या गणपती शाळेत सांगितले जातात. अर्थात काळानुसार भक्त आकर्षक गणेशमूर्तीची मागणी करू लागले आहेत. रंग, माती, मजूरांचे दर वाढल्यामुळे मुर्त्यांचे दर सुध्दा यावेळी वाढले असल्याचे नाना परब यांनी सांगितले. यावेळी प्रज्वल परब उपस्थित होते.

समस्या कधी सुटणार
वाढत्या महागाईचा फटका, रंगाचे वाढलेले दर, मातीच परराज्यातून, मजूरांचा तुटवडा असून देखील आजच्या काळात असे गणेशमूर्तीकार आपली कला जीवंत ठेवत आहेत. त्यात त्यांना वीजेची मोठी समस्या सतावत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार कळवून सुद्धा समस्या दूर होत नसून विजेचा लपंडाव सुरु आहे. याचा परिणाम मूर्तीकामावर होत आहे. मूर्त्यांचे ८० टक्के काम पूर्णत्वास आले असून आता रंगकाम सुरु झाले आहे. त्यामुळे विजेची आवश्‍यक आहे. वारंवार गुल होणारी वीज अखंडित वापरण्यास मिळावी अशी मागणी नाना परब यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com