आंबोली घाट कोसळल्याच्या अफवेने तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - गणेशोत्सवाला अवघे काही तास राहिले असताना जिल्ह्यात अफवांचा बाजार भरला. आंबोली घाटात दरड कोसळली, अशी अफवा सोशल मीडियावरून राज्यभर पसरली. यामुळे पुणे-कोल्हापूरमार्गे जिल्ह्याकडे येणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. पोलिस व सार्वजनिक बांधकामने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सावंतवाडी - गणेशोत्सवाला अवघे काही तास राहिले असताना जिल्ह्यात अफवांचा बाजार भरला. आंबोली घाटात दरड कोसळली, अशी अफवा सोशल मीडियावरून राज्यभर पसरली. यामुळे पुणे-कोल्हापूरमार्गे जिल्ह्याकडे येणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. पोलिस व सार्वजनिक बांधकामने अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

व्हॉटस्‌अॅपच्या माध्यमातून काल रात्रीपासून आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद असल्याचा संदेश फिरत होता. हा संदेश मुंबईसह राज्यभर पसरला. गणेशोत्सवासाठी कालपासूनच (ता. २२) जिल्ह्यात चाकरमानी दाखल व्हायला सुरुवात झाली. बहुसंख्य मुंबई, पुणेकर तसेच इतर भागातील चाकरमानी रस्ता चांगला असल्याने पुणे-बंगलोर हायवेने आंबोलीमार्गे येतात; मात्र हाच घाट बंद असल्याच्या संदेशामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांना संपर्क साधून अनेकांनी घाटाची स्थिती जाणून घेतली; मात्र जिल्ह्यातही सोशल मीडियावरील अफवा पसरली असल्याने संभ्रम आणखीनच वाढला. प्रशासनाने सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमुळे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. असे असलेतरी या अफवेचा फटका मात्र बऱ्याच जणांना बसला.

अशा अफवा कोणी पसरवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले असून अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी दिला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस म्हणाले, ‘‘कोणीतरी गंमत म्हणून ही अफवा फसविली होती; मात्र असा प्रकार करणे चुकीचे आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे घाट सुरक्षित आहे. त्यामुळे चाकरमान्यांना येण्यास हरकत नाही.’’

आंबोली घाट पूर्णतः सुरक्षित आहे. आमची माणसे घाटात असून खात्री केलेली आहे. आम्ही यापुढच्या स्थितीलाही सामोरे जायला अलर्ट आहोत. त्यामुळे चाकरमान्यांनी घाटात निर्धास्त यावे.
- सुरेश बच्चे-पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

आंबोली घाट कोसळल्याचा संदेश व्हॉटस्‌ ॲपवर फिरत आहे. त्या सोबत फोटोही आहे. हा फोटो दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाट कोसळल्याचा असून त्याचा आंबोलीशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे असा संदेश खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नये. अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील तिन्ही महत्त्वाचे घाट वाहतुकीसाठी पूर्णतः सुस्थितीत 
आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारची शंका असल्यास पोलिस नियंत्रण कक्षाशी (०२३६२-२२८२००) संपर्क साधावा.
- दीक्षितकुमार गेडाम, पोलिस अधीक्षक-सिंधुदुर्ग

Web Title: sawantwadi konkan news rumor ambaloli ghat collapsed