सावंतवाडी तहसीलच्या इमारतीस उद्‌घाटनाआधीच गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

अडीच कोटी खर्चून बांधकाम - चौकशीच्या मागणीसाठी भाजप करणार सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार

सावंतवाडी - सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या येथील तहसीलदार कार्यालयाला वापरापूर्वीच गळती लागली आहे. आज हा प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला. करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सार्व. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे, असा इशारा माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दिला.

येथील तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. सद्य:स्थितीत हे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा बांधकाम विभागातर्फे करण्यात आला. हे काम पूर्ण होण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत काही लोकांनी श्री. तेली यांच्याकडे वापरापूर्वीच या इमारतीला गळती लागली आहे, अशा तक्रार केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर श्री. तेली यांनी नगरसेवक आनंद नेवगी आणि पंचायत समितीची माजी उपसभापती महेश सारंग यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी त्या ठिकाणी इमारतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणावरून गळती सुरू आहे. त्याचबरोबर भिंतीतून पाणी गळत असल्याची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली.

याबाबत श्री. तेली यांनी नाराजी व्यक्त केली. झालेल्या प्रकाराबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांचे लक्ष वेधले आणि याबाबत आपण उद्या (ता. २९) बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आणि या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असणार आहे, असे श्री. तेली यांनी सांगितले. 

ठेका काढून घेणार
याबाबत श्री. तेली यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बच्चे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराकडून हा ठेका काढून घेण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया सुरू केली असून नवीन ठेकेदार नेमून त्याच्या माध्यमातून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. बच्चे यांच्याकडून सांगण्यात आले. बांधकामच्या एकूणच दुर्लक्षाबाबत श्री. तेली यांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी करण्यात येणारे वायरिंगही निकृष्ट दर्जाचे आहे, असे श्री. सारंग यांचे म्हणणे आहे.

Web Title: sawantwadi konkan news tahsil building water leakage