शिरोडा रेडी वाहतूक अचानक वळवली

शिरोडा रेडी वाहतूक अचानक वळवली

सावंतवाडी - शिरोडा रेडी पूल धोकादायक बनल्याने बांधकाम विभागाकडून त्याचे दुरुस्ती काम सुरू केले आहे. यामुळे परिसरातील वाहतूक लोकांना पर्यायी मार्गाने वळविले आहे. अचानक घेतल्यामुळे या निर्णयाबाबत 
ग्रामस्थांत नाराजी आहे. लोकांना विश्‍वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लागणारा वेळ आणि आर्थिक खर्च लक्षात घेता किमान दुचाकी आणि तीन चाकीला त्या ठिकाणीवरून प्रवेश द्या. लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने आज केली आहे. या मागण्या मान्य करण्यात येतील, असे आश्‍वासन बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश बच्चे यांनी दिले.

तालुक्‍यातील रेडी शिरोडा हा पुल वाहतुकीस धोकादायक झाला आहे. पुलाला भगदाड पडले आहेत. 

या पुलाची डागडुजीचे काम बांधकाम विभागाकडुन सुरू आहे. यासाठी अवजड वाहतूक त्या ठिकाणावरुन रोखली आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थांना त्यांचा फटका सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग हा दुरचा असल्यामुळे शाळकरी मुलांना आर्थीक भुर्दड सोसावा लागत आहे. त्याच बरोबर मच्छीमार तसेच अन्य व्यावसायिकांना त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी दुरचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही गोष्टी लागत आहे.

पुलाचे काम पुर्ण होईपर्यंत त्या ठिकाणावरुन गाड्या घालण्यात येवू नयेत, दुचाकी आणि तीनचाकी नेवू नयेत आणि नेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील, असा इशारा प्रांताकडून दिला होता. या निर्णयामुळे पंचक्रोशीतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम सुरू असल्यामुळे सुमारे दहा ते पंधरा किलोमिटरचा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे किमान लहान मुलांना येण्या-जाण्यासाठी तसेच दुचाकी तसेच तीनचाकी गाड्यांना जाण्यासाठी त्या ठिकाणावरुन परवागनी द्यावी, शाळकरी मुलांना दोन्ही बाजूने एसटी बसेसची व्यवस्था करावी, जास्तीत जास्त लवकर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडुन करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, तालुकाध्यक्ष संजू परब, माजी पंचायत समिती सदस्य चित्रा कनयाळकर, रुषाली राऊळ, मंगेश कामत, गायत्री सातोसकर, सायली सागर राणे, विजय गवंडी, निलेश रेडकर, सुभाष गवंडी, सायली पोखरणकर, गोट्या राऊळ, वैशाली राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या मागण्या श्री. बच्चे यांनी मान्य केल्या. तसेच संबधित पुल दुचाकी आणि तीन चाकी गाड्यांना चालू करण्यात येईल; मात्र पुलाच्या बांधकामासाठी आणखी तीन महीन्याचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रात्रीचे भूमिपूजन कसले ?
यावेळी त्या ठिकाणी आलेल्या चित्रा कनयाळकर यांनी या पुलाच्या दुरूस्तीच्या पुलाचे भूमिपूजन रात्रीच्यावेळी केल्याचा आरोप केला. रात्री भूमिपूजनाने आश्‍चर्य वाटल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आपल्याला काही राजकीय सांगू नका, असे श्री. बच्चे यांनी सांगुन तो विषय टाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com