दाम्पत्याला नियम मोडणे पडणार महागात, सावंतवाडी नगराध्यक्षांनी दिला इशारा

रुपेश हिराप | Tuesday, 28 July 2020

नगराध्यक्ष परब म्हणाले, ""शहरात कोरोनाचा झालेला शिरकाव लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये मंगळवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाला.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील चितारआळी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्यामुळे आज पूर्ण शहर त्रास सहन करत आहे. त्यांनी मोडलेले नियम लक्षात घेता त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. शहरात नियम न पाळणाऱ्या व्यापारी तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. 

नगराध्यक्षांनी आज पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृह पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाणीपुरवठा सभापती नासिर शेख, नगरसेवक आनंद नेवगी, उदय नाईक, भाजपा शहर उपाध्यक्ष अजय गोंदावले, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष परब म्हणाले, ""शहरात कोरोनाचा झालेला शिरकाव लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये मंगळवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाला.

काही आवश्‍यक निर्णयही घेण्यात आले. यामध्ये शहरामध्ये बेकरी व्यवसाय करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे यापुढे नियम मोडणाऱ्या सर्वच व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता व्यापारी संघाच्या सहकार्याने जनता कर्फ्यू लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. ई-पासच्या माध्यमातून मुंबई-पुणे फिरून येणाऱ्यांची माहिती पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेला द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.'' 

स्थानिक प्रशासन अनभिज्ञ 
नगराध्यक्ष म्हणाले, ""चितारआळीतील पॉझिटिव्ह आढळलेले दाम्पत्य ठाणे, मुंबई फिरून आल्यावर त्याबाबतची माहिती पालिकेला न देता व स्वतःला क्वारंटाईन न करता शहरामध्ये सगळीकडे फिरले. त्यामुळे संपूर्ण शहराला त्रास झाला. मुळात जिल्हाधिकाऱ्यांनी ई पास दिल्यानंतर त्याबाबतची माहिती पालिकेला देणे गरजेचे होते; परंतु ती माहिती नसल्याने व त्यांची तक्रारही कोणी न केल्याने तो कधी आला व कधी गेला हे पालिका प्रशासनाला समजू शकले नाही. 

गर्दी करू नका 
शहरातील मोती तलावामध्ये नारळी पौर्णिमेला दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता यावर्षी नागरिकांनी गर्दी टाळावी. सोशल डिस्टन पाळून तलावाला नारळ अर्पण करावा. याकरता पोलीस ठाण्याकडून योग्य तो बंदोबस्त करण्यात यावा, असे आवाहनही नगराध्यक्ष परब यांनी केले.  

संपादन - राहुल पाटील