केसरीत १७ धनगर कुटुंबे दडपणाखाली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - केसरी येथील धनगर समाजाच्या १७ कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे. समाजबांधव राहत असलेली घरे पाडण्याची भीती दाखविली जात आहे. अनेक घरांना घरपट्टी तसेच घरपत्रक उतारे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होते. त्यामुळे परिसरातील १७ कुटुंबे दहशतीखाली असल्याचा आरोप करुन त्या बांधवाना न्याय द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आज येथे पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांच्याकडे केली.

सावंतवाडी - केसरी येथील धनगर समाजाच्या १७ कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून त्रास दिला जात आहे. समाजबांधव राहत असलेली घरे पाडण्याची भीती दाखविली जात आहे. अनेक घरांना घरपट्टी तसेच घरपत्रक उतारे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होते. त्यामुळे परिसरातील १७ कुटुंबे दहशतीखाली असल्याचा आरोप करुन त्या बांधवाना न्याय द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आज येथे पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांच्याकडे केली.

संबंधितांना न्याय न दिल्यास त्यांचा आंदोलनाचा पवित्रा राहील आणि त्या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करू, असा इशाराही यावेळी श्री. गावडे यांनी दिला; मात्र जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन श्री. मडगावकर यांनी दिले.

तालुक्‍यातील केसरी भागात राहणाऱ्या धनगर बांधवांची घरे पाडण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ‘तुमची घरे निर्लेखित करण्यात येणार आहेत. त्यामुळे घरपट्टी घेणार नाही, घरपत्रक उतारा देण्यात येणार नाही’ असे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगितले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. पाच ते सहा वर्षे त्यांचा हा लढा सुरू आहे. अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. परिणामी त्या ठिकाणी वीज, पाणी आदी मूलभूत सोयी मिळण्यास त्यांना अडचणी निर्माण होत आहेत.

याबाबत अनेक वर्षे संबंधित धनगर बांधवांची मागणी आहे. आपली घरे कागदोपत्री अधिकृत करावीत, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाही, असे संबंधितांचे म्हणणे आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्‍मा सावंत यांची  भेट घेतली होती. 

त्या ठिकाणी सौ. सावंत यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेला त्यांना घरपत्रक उतारे द्या आणि घरपट्टी भरुन घ्या अशा सुचना केल्या होत्या; मात्र पुन्हा गावात आल्यानंतर ग्रामसेवकांनी त्यांना घरपट्टी भरुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित सर्व समाज बांधवानी श्री. गावडे यांची भेट घेवून त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानुसार आज श्री. गावडे यांनी सर्व बांधवाना घेवून श्री. मडगावकर यांची भेट घेतली. धनगर बांधवाना न्याय मिळाला पाहिजे त्यांना विज आणि पाण्याची सुविधा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी मडगावकर यांच्याकडे केली.

दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या गटविकास अधिकारी नाईक यांनी आपण याबाबत जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेवू असे सांगितले. मात्र श्री. गावडे यांनी याबाबत योग्यती कार्यवाही करा संबंधित धनगर बांधवाना न्याय द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी इंदू जंगले, चंद्रकांत पाटील, गंगाराम जंगले, धोंडू जंगले, काशीराम जंगले, शांताराम जंगले, रुपेश सावंत, महादेव सावळ आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्षांचे आदेश धाब्यावर
यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. गावडे म्हणाले, ‘‘संबंधित धनगर बांधवांना घरपट्टी तसेच घरपत्रक उतारा देण्यात यावा अशा सूचना खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. सावंत यांनी दिल्या होत्या. त्यावेळी ग्रामसेवकांनी मान्य केले होते. परंतु आता ते जबाबदारी झटकत आहेत. अध्यक्षांची सूूचना पाळली जात नाही हे दुर्दैव आहे.’’

या प्रकरणात धनगर बांधवांवर अन्याय होवू देणार नाही. काही झाले तरी घर बांधल्यानंतर कायद्याने त्यांना या गोष्टी दिल्या पाहिजेत. संबंधित घरमालकांच्या संमतीशिवाय ग्रामपंचायत घरे तोडू शकत नाही. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी अशा सुचना गटविकास अधिकारी श्री. नाईक यांना दिल्या आहे. 
- रविंद्र मडगावकर, सभापती, सावंतवाडी पंचायत समिती

Web Title: sawantwadi news dhangar family