जिल्हाभर विजेचा खेळखंडोबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

सावंतवाडी - पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण जिल्ह्यातच विजेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याबाबत अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. काल (ता. ७) येथे झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत विजेच्या समस्यांनी त्रासलेल्या लोकांकडून आता पदाधिकाऱ्यांना मारहाण होण्याची भीती व्यक्त केली, याची प्रचिती येते.

सावंतवाडी - पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण जिल्ह्यातच विजेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याबाबत अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. काल (ता. ७) येथे झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत विजेच्या समस्यांनी त्रासलेल्या लोकांकडून आता पदाधिकाऱ्यांना मारहाण होण्याची भीती व्यक्त केली, याची प्रचिती येते.

दरम्यान, याबाबत एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता वीज कार्यालयात अनेक समस्या आहेत. आवश्‍यक असलेली यंत्रणा देण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून दुर्लक्षाची भूमिका घेण्यात येत आहे. यामुळे काय करावे, असा प्रश्‍न आमच्याच समोर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे याबाबतची नेमकी माहिती घेण्यासाठी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जिल्ह्याची परिस्थिती ही डोंगराळ असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे ही वस्तुस्थिती आहे; परंतु त्यावर मात करण्याच्या उद्देशाने आमची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे सद्य:स्थिती लक्षात घेता वीज जाण्यास महत्त्वाची ठरणारी झाडी आणि मोठी झाडे तोडण्याचे काम करण्यात आले आहे. तसेच ज्या भागात धोकादायक वीज वाहिन्या आहेत, त्या ठिकाणी गार्डनिंग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच अन्य ठिकाणी जिल्हास्तरावर एक एजन्सी नेमून काम करण्याचे आदेश दिले आहे.

पावसाळ्यात विजेच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी आमच्याकडून दक्षता घेण्याचे काम सुरू आहे. देवगड, वैभववाडी, मालवण, कणकवली अशा भागात दोन ट्रान्सफार्मर तसेच अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात वायर इन्सुलेटर आदींचा समावेश आहे. तसेच स्थानिक ठिकाणी विजेच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर टेंडर काढून सोडवायची आहे. तसे त्यांना अधिकार देण्यात आले असून त्यांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे.’’ दरम्यान, एखादा अपघात घडल्यास त्या ठिकाणी असलेल्या नागरिक अथवा ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर त्यांना तत्काळ मदत देण्यात येणार आहे. तसेच खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

लोकांचे सहकार्य आवश्‍यक 
याबाबत माहिती देताना श्री. पाटील म्हणाले, ‘‘आमच्या टीमकडून लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे; मात्र वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक संकटाला तोंड द्यावेच लागणार आहे. 

नुकत्याच सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्‍यात झालेल्या वादळामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते; परंतु या सर्व गोष्टीत आम्हाला लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.’’

Web Title: sawantwadi news electricity

टॅग्स