मध्य प्रदेशचा कामगार जपतोय कोकणची संस्कृती

अमोल टेंबकर
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

आमच्या गावातसुद्धा गणेशोत्सव धुमधडाक्‍यात साजरा केला जातो; मात्र त्याठिकाणी गावात एक गणपती असतो. याठिकाणी आल्यानंतर प्रत्येक घरात गणपती पाहायला मिळाला आणि त्यातून स्फूर्ती मिळाली. बाजूला राहणारे ग्रामस्थ सुहास हरमलकर, संजय हरमलकर, रवी हरमलकर, दाजी हरमलकर अशा लोकांनी पाठिंबा दिल्याने आपण हा उत्सव गेली चार वर्षे निर्विघ्न पूर्ण करू शकलो.
- हीरा ऊर्फ हिरालाल भरतलाल बर्मन, मध्य प्रदेश

सावंतवाडी -  आपल्या कामातून वेळ काढत कोकणचे विविध कलाप्रकार जपणारा गणेशोत्सव साजरा करून मध्य प्रदेश येथील युवकाने येथील लोकांना एक आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे या उत्सवात बिहार, बंगालसह अन्य ठिकाणच्या कामगारांनासुद्धा त्याने समाविष्ट करून घेतले आहे. 

गणेश ही बुद्धीची देवता आहे. आमच्या गावातसुद्धा त्यांचे पूजन होते; मात्र त्याठिकाणी जाणे शक्‍य नसल्यामुळे आपण याच ठिकाणी त्यांची आराधना करतो, असे हीरा ऊर्फ हिरालाल भरतलाल बर्मन याचे म्हणणे आहे.

तालुक्‍यातील मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात एका खासगी महाविद्यालयाच्या उभारणीचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. याठिकाणी बांधकामावर मजूर म्हणून आलेल्या या युवकाने गेली अनेक वर्षे याठिकाणी वास्तव्य केले आहे. गणेशोत्सव काळात कामामुळे हजारो किलोमीटर त्याला गावात जाणे शक्‍य होत नाही. यामुळे त्याने आपण काम करीत असलेल्या ठिकाणी गणेशमूर्ती पूजन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रथम त्याने आपल्यासोबत असलेले नातेवाईक बिन्दाल बर्मन, सतई बर्मन, छोटू बर्मन यांच्यासह सहकारी कामगार कुंदीलाल मंडल, गुड्डू वटार या कामगारांची मदत घेतली. आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये गणेशोत्सव साजरा केला. आज सलग चौथ्या वर्षीसुद्धा त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी गणेशमूर्तीचे पूजन केले आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकांनी प्रोत्साहन दिल्यानंतर सत्यनारायण महापूजासुध्दा त्याने घातली आहे. या वर्षी महाविद्यालयाचे काम पूर्ण होईल. आता पुढच्या कामावर जाऊ, त्याठिकाणी गणेशोत्सव साजरा करू; मात्र कोकणी सणांना विसरणार नाही, असे हीरा म्हणाला.

Web Title: sawantwadi news konkan Madhya Pradesh worker