सावंतवाडीकरांना असा मिळाला राजेबहाद्दर किताब

सावंतवाडीकरांना असा मिळाला राजेबहाद्दर किताब
Summary

दिल्लीतील गादीवर तेव्हा मोगल बादशहा शहाआलम याची सत्ता होती. त्याचे उमराव (सरदार) बादशहाचा हुकूम मानेनासे झाले होते.

सिंधुदुर्ग : तिसरी खेम सावंत (राजश्री) (Khem Savant) यांच्या कारकीर्दीत सावंतवाडीकरांना (Savantwadi) दिल्लीच्या बादशहाने राजबहाद्दूर असा किताब, मोर्चेलांचा मान व भरजरी पोषाख देऊन सन्मानित केले. हा बहुमान कोल्हापूरकरांना (Kolhapur)खटकला. त्यांनी सावंतवाडीशी थेट संघर्षच सुरू केला. याला पेशव्यांकडूनही अप्रत्यक्ष साथ मिळाली. या किताबानंतर सावंतवाडीकरांचा मान आणखी वाढला असला तरी संघर्षही तितकाच टोकाला गेला. (sawantwadi-people-awarded-Rajebahaddur-Kitab-historical-sindhudurg-marathi-news)

दिल्लीतील गादीवर तेव्हा मोगल बादशहा शहाआलम याची सत्ता होती. त्याचे उमराव (सरदार) बादशहाचा हुकूम मानेनासे झाले होते. वजीरी मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये आपापसात भांडणे सुरू होती. बादशहाला त्यांचा बंदोबस्त करायचा होता. त्याकाळात ग्वाल्हेरच्या महादजी शिंदे यांचा बोलबाला होता. बादशहाने या उमरावांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिंदेंवर सोपवली. तशा पध्दतीचे गुप्त फर्मान पाठवले. ही कामगिरी मोठ्या जबाबदारीची होती. त्यामुळे महादजींनी आपले सेनापती जीवबादादा यांना ती पार पाडण्यास सांगितली. १७८४ मधला हा संघर्ष होता. जीवबादादांनी मोठा पराक्रम दाखवत उन्मत्त झालेल्या या सगळ्या उमरावांचा पराभव केला. यामुळे शिंदे आणि जीवबादादा यांचे दिल्ली दरबारातील वजन वाढले. पुढे तर बादशहा शहाआलम यांनी दिल्लीचा बराचसा कारभार शिंदे यांच्याकडे सोपवला.

सावंतवाडीकरांसाठी काहीतरी करण्याची ही संधी असल्याचे जीवबादादांच्या लक्षात आले. त्यांनी आपली ही इच्छा महादजी यांच्याकडे बोलून दाखवली. महादजी यांचेही सावंतवाडीकरांशी नाते जुळले होते. त्यांनी बादशहांशी याबाबत चर्चा केली. सावंतवाडीकरांचा पराक्रम त्यांना कथन केला. यानंतर बादशहांनी सावंतवाडीच्या सरदेसाईंना राजेबहाद्दूर असा किताब, मोर्चेलांचा मान व भरजरी पोषाख मिळावा असे फर्मान काढले.

जीवबादादांनी शिंदेशाहीतील नोकर बळवंत रघुनाथ दळवी आणि साबाजी वासुदेव आरवलीकर यांच्याकडे बादशहाकडून मिळालेल्या सन्मान, मोर्चेला आणि भरजरी पोषाख सावंतवाडीकरांकडे पाठवला. ते आकेरीपर्यंत आले. यानंतर जीवबादादांचे बंधू नरोबा यांच्यामार्फत तिसरे खेमसावंत यांना याबाबत कळवण्यात आले. आकेरीत माणसे पाठवून समारंभपूर्वक त्यांना दरबारात आणण्यात आले. ११ मे १७८५ ला एका शुभमुहूर्तावर राजांनी हा बहुमान आदरपूर्वक स्विकारला. यानंतर सावंतवाडी संस्थानचे सरदेसाई हे आपल्या नावासमोर राजेबहाद्दर हा किताब लावू लागले. ज्यांनी दिल्लीहून हा सन्मान आणला त्या दोघांनाही रेडी आणि आरवली येथे जमिनी इनाम म्हणून देण्यात आल्या.

बादशहानी सावंतवाडीकरांना हा सन्मान दिल्याबाबतचे संदर्भपत्र शाहू छत्रपती, करवीरकर, पेशवे, गोव्याचा गव्हर्नर जनरल, टिपूसुलतान यांनाही पाठवली होती. करवीरकर आणि सावंतवाडीकर यांच्यात आधीपासूनच संघर्ष होता. दिल्ली दरबारातून सावंतवाडीकरांना हा किताब मिळाल्याची गोष्ट पुण्याच्या पेशव्यांनाही आवडली नाही. त्यांनी आपला सरदार हरीपंत फडके याला करवीरकरांच्या मदतीला पाठवले. दोघांनी सल्ला मसलत करून सावंतवाडीकरांकडे हा किताब पुढे चालू नये म्हणून त्यांच्यावर हल्ल्याची योजना आखली. १७८३ मध्ये मोठ्या फौजेसह करवीरकर सावंतवाडीवर स्वारी करून आले. त्यांनी वाटेत हेरेचे ठाणे, गंधर्वगड, व रांगणागड या किल्ल्यावर आपले सरदार नरसिंगराव शिंदे आणि यशवंतराव शिंदे सुभेदार यांना पाठवून ते सर केले. नंतर घाट उतरून त्यांनी नरसिंहगड, भरतगड व निवती हे किल्ले घेतले. वेंगुर्ल्याचा कोट ताब्यात घेवून ते तेथे तळ ठोकून बसले.

अचानक झालेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देणे सावंतवाडीकरांसाठी कठिण होते. त्यांच्याकडे फारसे सैन्य नव्हते. दारूगोळाही मर्यादीत होता. आधी झालेल्या लढायांमुळे खजिना रिता झाला होता. त्यामुळे नाईलाजाने त्यांना पोर्तुगीजांकडे मदत मागावी लागली. यासाठी पोर्तुगीजांना येणाऱ्या खर्चाच्या बदल्यात पेडणे महाल त्यांना देवू केला. तसे पोर्तुगीजही सावंतवाडीकरांचे कट्‌टर शत्रू होते; मात्र घाटावरून खाली उतरून येणारा शत्रू त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी सावंतवाडीकरांचा प्रस्ताव झटकून दिला नाही; मात्र आपल्या अटी वाढवल्या. सावंतवाडीकरांना अडचणीत आणण्याची ही संधी त्यांनी अचूक हेरली. पेडणे बरोबरच डिचोली व साखळी हे महाल, हळर्णचा कोट येथील पोर्तुगीजांचा सावंतवाडीकरांनी आधी जिंकलेला भाग सोडून द्यावा अशी अट घातली. सावंतवाडीकर ती मान्य करेना. तेव्हा पोर्तुगीजांनी पेडणे महालावर आपले सैन्य पाठवण्याची भिती घातली. त्यामुळे सावंतवाडीकरांचा नाईलाज झाला. शेवटी २९ जानेवारी १७८८ ला या दोघांमध्ये तह झाला. त्यानंतर ४ फेब्रुवारी १७८८ ला पोर्तुगीजांनी पेडणे महालाचा ताबा घेतला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ५ फेब्रुवारीला पोर्तुगीजांनी आपले सैन्य सावंतवाडीकरांच्या मदतीला पाठवले. दरम्यान तिकडे करवीरकरांनी रेडी येथील किल्ल्याची नाकाबंदी केली होती. पोर्तुगीजांनी हा वेढा उठवण्यासाठी सगळ्यात आधी आपले आरमार पाठवले. पोर्तुगीजांची मदत आल्याचे पाहून करवीरकरांनी ताब्यात घेतलेली ही ठाणी सोडून मालवण येथे परत जायचा निर्णय घेतला. या फौजेचा सावंतवाडीकरांनी पाठलाग करुन पूर्ण पराभव केला नाही.

काही दिवसांनी पुन्हा करवीरकरांनी सावंतवाडीवर चाल करण्यासाठी मालवणहून सैन्य पाठवले. नांदोस येथे त्यांची सावंतवाडीच्या फौजेशी पहिली लढाई झाली. यात सावंतवाडीकरांचा पराभव होवून त्यांच्याकडील शिवराम जिवाजी सबनीस, माणगावकर भोसले व उसपकर आणि परमेकर देसाई हे सरदार करवीरकरांच्या सैन्यांच्या हाती लागले. त्यांना मालवण येथील किल्ल्यात नेवून ठेवण्यात आले. करवीरकरांनी पुढे आकेरीपर्यंत मजल मारली. तेथे दोन्ही सैन्यामध्ये मोठी लढाई झाली. त्यात करवीरकरांचा डुबल नावाचा एक मोठा सरदार आणि आणखी काहीजण मारले गेले. त्यामुळे ते मालवणपर्यंत मागे फिरले.

पोर्तुगीजांचे पाठबळ सावंतवाडीकरांना असल्यामुळे विजय मिळवणे कठिण असल्याचे करवीरकरांच्या लक्षात आले. मग त्यांनी पोर्तुगीजांनाच शह देण्यासाठी काही सैन्य रवाना केले. हे सैन्य रामघाट उतरून खाली आले. त्यांनी डिचोलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. नंतर हे सैन्य मडुरामार्गे आरोंद्याच्या नदीपर्यंत चाल करून गेले. आकेरी येथेही काही सैनिक त्यांनी पाठवले; मात्र याच दरम्यान सावंतवाडीकर आणि पोर्तुगीज यांचे सैनिक एकत्र आले. त्यांच्यापुढे आपला टिकाव लागणार नसल्याचे लक्षात येवून करवीकरांच्या सैन्याने माघार घेतली; मात्र वाटेत जिंकलेल्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आपले लोक नियुक्‍त केले. पुढे करवीरचे सैन्य गेल्यानंतर पोर्तुगीजांनी आपले सैन्य मागे बोलावले.

sawantwadi-people-awarded-Rajebahaddur-Kitab-historical-sindhudurg-marathi-news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com