मळगावच्या धबधब्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा

भूषण आरोसकर 
शुक्रवार, 21 जुलै 2017

सावंतवाडी - झाराप पत्रादेवी हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले मळगाव घाटीतील धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत; मात्र मळगाव घाटीतील पर्यटनाच्या वाटा खुल्या होण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. सातार्ड्यातून मळेवाडच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी गोवा या मार्गावर मळगाव वसले आहे. 

सावंतवाडी - झाराप पत्रादेवी हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले मळगाव घाटीतील धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत; मात्र मळगाव घाटीतील पर्यटनाच्या वाटा खुल्या होण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. सातार्ड्यातून मळेवाडच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी गोवा या मार्गावर मळगाव वसले आहे. 

सावंतवाडी शहराकडून गावाकडे जातानाच मळगाव घाटी लागते. सातार्डा-मळेवाडच्या दिशेने येणारा गोव्यातील पर्यटक बहुतेक याच मार्गाने मुंबईच्या दिशेने जातो. वेंगुर्लेतील पर्यटनाचा आनंद घेवून सावंतवाडीच्या पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी तसेच शहरात खानपानासाठी याच मार्गाला पसंती देतात. यामुळे यामार्गावर पर्यटक वर्गाची संख्याही मोठी असते. उन्हाळी दिवसात मळगावच्या बॉक्‍सवेलकडून गाडी पार झाल्यावर उन्हाच्या लाहीमुळे थंडावा देण्यात मोठी भूमिका बजावतो तो मळगाव घाट. बहुतेकवेळा पर्यटकांची गाडी येथे थांबलेली नजरेस पडत असते. मनाला भुरळ घालत असलेल्या या घाटीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झालेला दिसून येत नाही. घाटीत बारमाही पर्यटन होवू शकत नसले तरी वर्षा पर्यटनासाठी मळगाव घाटीत प्रवाहित झालेले धबधबे पर्यटकांना साद घालत आहेत. घाटीतील मुख्य वळणाच्या समोर असलेला धबधबा बराचकाळ चालु असतो.  इतर दोन छोटे धबधबे सहा ते सात महिने चालू असतात. याचा विचार करुन येथे पर्यटनास वाव मिळू शकतो. सद्यस्थितीत हे धबधबे चांगलेच प्रवाहित झाल्यामुळे ये-जा करणाऱ्या पर्यटक तसेच नागरीकांचे मन वेधून घेत आहेत. वनविभागाकडून याचा पर्यटनदृष्ट्या विचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी पर्यटनासाठी काही सोयी सुविधांचा पाठपूरावा केल्यास सावडाव व मांगेलीच्या धर्तीवर येथे पर्यटन बहरू शकते. गेल्या कित्येक वर्षापासून हे धबधबे पर्यटनदृष्ट्या विकसित होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दुर्लक्षित राहिलेल्या या धबधब्याजवळ ये-जा करणारे काही नागरिक सेल्फीसाठी थांबतात. तर मार्गावरुन जाणारा नवखा पर्यटकही धबधब्याजवळ आंघोळीस जाण्यास पसंती देतो. बाहेरील पर्यटकाच्या नजरेआड राहिलेल्या या धब्याधब्याजवळ स्थानिक नागरिक मात्र मौजमजा करण्यासाठी येत असतात. चांगला पाऊस झाला की घाटीतल्या या दोन महत्वाच्या धबधब्यासोबत इतरही काही छोटे धबधबे प्रवाहित होतात. मळगाव घाटीचा राखीव वनक्षेत्रात पडत असल्यामुळे याठिकाणी बरेच वन्यप्राण्यांचे अस्तित्व आढळते. वन्य अभ्यासकासाठीच्या नजरेतही हा वनपरिसर तसा दुर्लक्षितच राहिला होता. या सर्वांचा एकत्रित विचार करता घाटीवरील असलेले निसर्गरम्य परिसर, जंगले, पक्षी, किटक व इतर जीव जंतूचे अस्तित्व असलेले हे एकुणच सर्वांनाच वनक्षेत्र साद घालत आहे. लवकरात लवकर याचा विचार करुन पर्यटनासाठी पाठपुरावा करण्याची मागणी मळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून होत आहे.

मळगाव येथे प्रवाहित होणारे धबधबे मळगावच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारे आहेत. मळगाव वर्षापर्यटनाच्या विकासासाठी आपण एप्रिल महिन्यात वनविभागाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात यापूर्वीच सुचविलेले होते.
- गणेशप्रसाद पेडणेकर, सरपंच मळगाव

शहरापासून जवळच ही घाटी निसर्गरम्य परिसरात आहे. याचा विचार करून मळगाव घाटीतील पर्यटनासंदर्भांत वरिष्ठ स्तरावर कार्यवाही चालु आहे. त्यासाठी काही अवधी लागणार आहे. 
- विजय कदम, वनक्षेत्रपाल सावंतवाडी

Web Title: sawantwadi waterfall tourist