सायबाशेजारी आणखी एक धरण - हुस्नबानू खलिफे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

राजापूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या येथे नवीन धरणाचे बांधकाम करण्यासाठी विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्यात आली.

राजापूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या येथे नवीन धरणाचे बांधकाम करण्यासाठी विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे धरणाच्या नव्या बांधकामासाठी सुमारे दहा कोटी रुपये निधी मंजूर केला, अशी माहिती आमदार हुस्नबानू खलिफे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
त्यामुळे लवकरच धरणाच्या बांधकामाला सुरवात होऊन राजापूरवासीयांचे बारमाही मुबलक पाणीपुरवठा होण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातून राजापूर शहराला पाणीपुरवठा होतो.

धरणातील पाणीसाठा हा शहराचा मुख्य जलस्रोत आहे; मात्र या धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. धरणामध्ये गाळ साठलेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये धरणातील पाणीसाठा खालावतो. एप्रिल-मेमध्ये शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ज्या नदीवर सायबाचे धरण बांधलेले आहे, तेथे पाण्याचा प्रवाह पावसात तीव्र असतो. त्यामुळे धरणाची ढासळेली भिंत कोसळून शहरामध्ये पुराचे पाणी घुसण्याचीही भीती आहे. याबाबत सौ. खलिफे यांनी विधानसभेत वारंवार प्रश्‍न उपस्थित केला.

त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी धरणाचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सांगली येथील वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिरिंगकडून संरचनात्मक परीक्षण पावसाळ्यामध्ये करून त्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यावर पुन्हा एकदा सौ. खलिफे यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी अनुकूल निर्णय दिल्याचे सौ. खलिफे यांनी सांगितले. सध्या असलेल्या सायबाच्या धरणाच्या वरच्या बाजूला स्वतंत्र धरण बांधण्यात येईल. धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यात येईल. त्यामुळे धरणामध्ये पाण्याचा साठा होऊन शहराला बारमाही पुरवठा होईल. नव्या धरणाला सुमारे दहा कोटी रुपये निधी आवश्‍यक आहे. नव्या धरणाच्या बांधकामाचा लवकरच प्रारंभ होईल. त्यामुळे भविष्यामध्ये राजापूरला बारमाही मुबलक पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण होईल.

Web Title: sayaba neighbors a dam