सिंधुदुर्ग किल्ला पर्यटनासाठी खुला ; होडीची वाहतुक सुरु

सकाळ वृत्तसेवा | Sunday, 8 November 2020

त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 

मालवण : ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन घडविणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेस होडी वाहतूक सुरू करण्यास अटी, शर्ती घालत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी परवानगी दिली. त्यामुळे पर्यटकांना आता किल्ला दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मार्चपासून किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद होती. शासनाने अनलॉक करत पर्यटन सुरू केल्यानंतरही येथील किल्ला प्रवासी वाहतुकीस परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे पर्यटकांना बंदर धक्का येथूनच किल्ला दर्शन घेत माघारी परतावे लागत होते. त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत होती. वादळ आणि कोरोनाच्या संकटामुळे किल्ला प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळून उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे प्रवासी होडी वाहतूक संघटनेने परवानगी मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. 

हेही वाचा - एमआयडीसीत मंदीनंतर संधी ; ४०० जणांना मिळणार रोजगार -

याबाबत संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काही अटी घालत प्रवासी बोट वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आमदार नाईक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. 
प्रवासी बोट वाहतूक संघटनेने प्रत्येक दिवशी एका बोटीच्या केवळ दोन फेऱ्या माराव्यात, प्रवासी वाहतूक करताना सामाजिक अंतर, सॅनिटायझर करणे, पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देणे आवश्‍यक आहे.

बुकिंगच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना देण्याबरोबरच खुणा माराव्यात, प्रवाशांची तापमान, ऑक्‍सिजन पातळी याची तपासणी करावी, प्रवाशांच्या सर्व नोंदी, पंधरा दिवसाच्या प्रवासाची माहिती घ्यावी, बुकिंगच्या ठिकाणी ई-पेमेंट सुविधा द्यावी, ऑनलाईन बुकिंगसाठी प्राधान्य द्यावे, प्रवाशांचे तापमान, ऑक्‍सिजन पातळीत बदल दिसल्यास अशा प्रवाशांना प्रवास करण्यास प्रतिबंध करावा, तिकीट विक्रीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्‍यक साहित्याचा वापर करणे बंधनकारक राहील, बोटमन तसेच पर्यटकांनी मास्क, फेसशिल्ड वापरणे बंधनकारक असेल. 

हेही वाचा -  पाटबंधारे प्रकल्पात कोकणाला प्राधान्य -

एका बोटीमध्ये सामाजिक अंतर पाळत केवळ सहाजणांना प्रवेश द्यावा, सहली व मोठ्या समूहांना एकत्रित प्रवास करण्यास प्रतिबंध असेल. प्रत्येक फेरीनंतर बोट निर्जंतुक करणे आवश्‍यक असेल. प्रवासी बोट वाहतुकीसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व परवानग्या घेणे बंधनकारक राहील, अशा अटी आहेत. याचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

 

संपादन - स्नेहल कदम