'वायू'चा कोकणाला तडाखा, देवबागला घरांत घुसले पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली असून शवदाहिनी वाहून गेली आहे. यात आनंद कुमठेकर यांच्या होडीचे लाटांच्या तडाख्यात नुकसान झाले.

मालवण - सोसाट्याच्या वाऱ्यासह खवळलेल्या समुद्राचा जोरदार तडाखा देवबागला बसला. येथीळ ख्रिश्‍चन वाडीतील दोन घरांना पाण्याने वेढा घातल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. 

देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली असून शवदाहिनी वाहून गेली आहे. यात आनंद कुमठेकर यांच्या होडीचे लाटांच्या तडाख्यात नुकसान झाले.

समुद्राने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कालपासून सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा जोर आज मोठ्या प्रमाणात वाढला होता. समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा मोठा फटका देवबाग गावास बसला. ख्रिश्‍चनवाडीतील दोन घरांना समुद्राच्या पाण्याने वेढा घातला. तर काही घरांमध्ये पाणी घुसले.

संगम येथील बरीच जमीन समुद्राने गिळंकृत केली. यात शवदाहिनीही समुद्रात वाहून गेली. जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, मनोज खोबरेकर, पंच सदस्य फिलसू फर्नांडिस, निहीता गावकर, नागेश चोपडेकर, रमेश कोद्रेकर, जॅक्सन फर्नांडिस, आनंद तारी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.

Web Title: sea water enters in Devbag in Sindhudurg