सी वर्ल्ड जमिनीसाठी चांगला मोबदला देऊ - जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

आचरा - जगातील ४० देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आहे. आपल्याकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटक आले तरच आपले पर्यटन भरभराटीस येऊ शकते. यासाठी सी वर्ल्ड प्रकल्प आवश्‍यक आहे. लोकांचा १३०० एकरला विरोध बघूनच हा प्रकल्प ३५० ते ४०० एकरमध्ये करण्याचे ठरविले असून त्याचे नियोजन झाले आहे. अजून कामास सुरवात झाली नाही. यासाठी तुम्ही सहकार्य द्या. चांगला मोबदला दिला जाणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तोंडवली येथे सांगितले.

आचरा - जगातील ४० देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आहे. आपल्याकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटक आले तरच आपले पर्यटन भरभराटीस येऊ शकते. यासाठी सी वर्ल्ड प्रकल्प आवश्‍यक आहे. लोकांचा १३०० एकरला विरोध बघूनच हा प्रकल्प ३५० ते ४०० एकरमध्ये करण्याचे ठरविले असून त्याचे नियोजन झाले आहे. अजून कामास सुरवात झाली नाही. यासाठी तुम्ही सहकार्य द्या. चांगला मोबदला दिला जाणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी तोंडवली येथे सांगितले.

तोंडवली वाघेश्‍वर मंदिरात प्रकल्पग्रस्त तोंडवलीवासीयांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पर्यटनमंत्री रावल यांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘लगतचे गोवा सरकार ३५० एकरात सी वर्ल्ड 
साकारत असून त्यासाठी त्यांनी आर्थिक तरतूदही केली आहे. तुम्ही विरोध करत राहिलात तर गोवा राज्य आपला प्रकल्प पूर्ण करेल आणि या प्रकल्पाचे आपल्याकडील महत्त्व कमी होईल आणि आपल्या सर्वांचे भवितव्य घडविणारा हा प्रकल्प हातचा जाऊन सुवर्णसंधी गमावणार.’’

कुणकेश्‍वर मिठबाव येथून नियोजित वेळेपेक्षा उशिराने तोंडवली येथे दाखल झालेले पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत वायंगणी तोंडवली येथील नियोजित सी वर्ल्ड प्रकल्पाच्या साकारणाऱ्या जागेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तळाशिल येथील बीचची सायंकाळच्या संधिप्रकाशात पाहणी केली. तळाशिल येथील गोपाळकृष्ण मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री केसरकर आणि पर्यटनमंत्र्यांकडे तळाशिलवासीयांच्या समस्या कथन केल्या. यात खाडी आणि समुद्राच्या बाजूने संरक्षक बंधाऱ्याची मागणी केली. त्यानंतर तोंडवली येथील हुतात्मांच्या स्मारकास भेट देऊन वाघेश्‍वर मंदिरात घेतलेल्या बैठकीत सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत आशीष पाटील यांनी उपस्थित केलेल्या लेखी प्रश्‍नांबाबत पर्यटनमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. या वेळी त्यांनी सी वर्ल्ड प्रकल्पाचे फक्त नियोजन झाल्याचे सांगून कामास अजून सुरवात झाली नसल्याचे सांगितले.

भारत सरकारच्या योजनेअंतर्गत १०० कोटींचा निधी पर्यटनासाठी होता. यासाठी महाराष्ट्र राज्यानेही प्रस्ताव केला. यात ८७ कोटी प्राप्त झाले आहेत. ता सर्वच्या सर्व सिंधुदुर्गासाठी दिले जाणार आहेत. यात तोंडवली तळाशिलसाठी येत्या १२ महिन्यांत १२ कोटी ६७ लाखाचे काम करण्याचे ठरविले आहे, असेही रावल यांनी सांगितले.

वायंगणीवासीयांची पाठ
सी वर्ल्ड नियोजित जागेच्या पाहणीसाठी आलेल्या पर्यटन मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत वायंगणी ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नसल्याचे प्रफुल्ल माळकर व आदी ग्रामस्थांकडून सांगितले जात होते. त्यामुळे प्रखर विरोध असलेला आणि जास्त भाग सी वर्ल्डसाठी जाणाऱ्या भागातील ग्रामस्थांनाच पर्यटनमंत्र्यांनी बगल दिली की सोबतच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी हेतुतः भेट घेण्याचे टाळले. याबाबत स्पष्ट होत नव्हते; मात्र या भागात आलेल्या पर्यटनमंत्र्यांनी सी वर्ल्ड प्रकल्प खरोखरच मार्गी लावायचा असेल तर सर्वांना विश्‍वासात घेऊनच आजची बैठक होणे आवश्‍यक होते.

Web Title: Sea World to give up in exchange for land