विरोध मोडत सी वर्ल्डसाठी मोजणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

आचरा- वायंगणी येथे आज सर्व्हे क्रमांक 102 मधून मोजणीस सुरवात झाल्यानंतर विरोधाची भूमिका घेत घटनास्थळी दाखल झालेल्या वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थांनी मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांच्या कारवाईच्या भूमिकेने ग्रामस्थांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांनी माळरानावर बैठक घेत पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकमंत्र्यांवर करत त्यांचा निषेध केला. तसेच न्यायालयात जात सी-वर्ल्ड प्रकल्प हटविण्याचा निर्धार केला.

आचरा- वायंगणी येथे आज सर्व्हे क्रमांक 102 मधून मोजणीस सुरवात झाल्यानंतर विरोधाची भूमिका घेत घटनास्थळी दाखल झालेल्या वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थांनी मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांच्या कारवाईच्या भूमिकेने ग्रामस्थांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांनी माळरानावर बैठक घेत पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकमंत्र्यांवर करत त्यांचा निषेध केला. तसेच न्यायालयात जात सी-वर्ल्ड प्रकल्प हटविण्याचा निर्धार केला.

सकाळी आठ-साडेआठ वाजल्यापासून तोंडवळी फाट्यावर उभे असलेल्या पोलिस कर्मचारी, वनविभाग, कृषी, महसूल कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवत अकरा वाजण्याच्या दरम्यान दाखल झालेल्या भूमि अभिलेख अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आगमनानंतर वायंगणी माळरानावर सर्व्हे क्रमांक 102 मधून मोजणीस प्रारंभ करण्यात आला. या वेळी पर्यटन विकास महामंडळाचे किरण सुलाखे, श्री. माने यांच्या मार्गदर्शनाखाली भूमि अभिलेखच्या उपअधीक्षक अनुराधा आगम यांच्या उपस्थितीत मोजणीस सुरवात करण्यात आली. या वेळी कृषी विभागाचे एम. डी. ठाकूर, आचरा मंडल अधिकारी श्री. पारकर, तलाठी श्री. कांबळे, वनविभागाचे देवले आदी उपस्थित होते. एकूण आठ कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांसह भूमि अभिलेखकडून मोजणीला सुरवात करण्यात आली. आचरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी 20 पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळपर्यंत मोजणी शांततेत सुरू होती. 25 नोव्हेंबरपर्यंत ही मोजणी सुरू राहणार आहे.

मोजणीला सुरवात होण्याच्या पूर्वीच इतरत्र विखरून बसलेल्या ग्रामस्थांना सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी मोजणीस विरोध केल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले होते. तरीसुद्धा मोजणी सुरू झाल्यानंतर सुमारे 60 ते 70 ग्रामस्थ एकत्र येत मोजणीस्थळी दाखल झाले. भूमि अभिलेख आणि पर्यटन महामंडळ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी उदय दुखंडे यांनी शेतकऱ्यांना सहधारक करत एमटीडीच्या नावे नोटिसा काढल्याबद्दल भूमि अभिलेख अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आम्हाला प्रकल्प नकोच, तर मोजणी का? असे विचारत मोजणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण श्री. शिंदे यांनी पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे संकेत दिल्याने सर्व ग्रामस्थांनी तेथून काढता पाय घेतला. मोजणीच्या ठिकाणापासून काही अंतरावर ग्रामस्थांनी बैठक घेतली. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणेच विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी वाटाघाटीने जमीन घेणार असे म्हणणारे शासन बळजबरीने जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने असून आम्ही न्यायालयीन लढाई लढत न्याय मिळवू. पण शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला हा प्रकल्प हटवूच असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. पालकमंत्री केसरकर यांचा निषेधही या वेळी ग्रामस्थांनी केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका जाहीर करावी. वायंगणीतील काही ग्रामस्थांनी केसरकर हे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची ही भूमिका नसल्याचे सांगितले. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही या प्रकल्पाला समर्थन दिल्याचे सांगितल्यावर वायंगणी ग्रामस्थ प्रफुल्ल माळकर यांनी पालकमंत्री, आमदार, खासदार वेगवेगळी भूमिका घेऊन ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत. त्यापेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली.

वायंगणी, तोंडवळी येथे होणाऱ्या संयुक्त मोजणीला काढण्यात आलेल्या एकूण पाच हजार नोटिसांपैकी 528 जणांनी नोटिसा स्वीकारल्या आहेत अशी माहिती भूमि अभिलेखच्या उपअधीक्षक आगम यांनी सांगितले. तसेच मोजणीची मागणीही एमटीडीसीने केल्याने नोटिसा या त्यांच्या नावे काढल्या तर शेतकऱ्यांना सहधारक प्रत बनविले असे सांगितले. यावर 2013 मध्ये थेट शेतकऱ्यांनाच नोटिसा काढल्या होत्या, असे सांगितले असता याबाबत त्यांनी बोलण्याचे टाळले.

Web Title: sea world measurement despite opposition