दोडामार्गात उभारणार सुरक्षा यंत्रणा

नगराध्यक्षांचा निर्णय; सीसीटीव्हीसह रक्षकांची नेमणूक होणार
cctv camera
cctv camerasakal

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आज आश्वासक पाऊल उचलले आहे. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमणे, आवश्यक तेथे सीसीटीव्ही लावणे, स्थानिकांच्या घरांमध्ये आणि झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कामगार आणि भाडेकरूंची नोंद करणे आदींची अंमलबजावणी व्यापारी संघ, घरमालक, नगरसेवक आणि नागरिकांच्या मदतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काही व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची बैठक घेऊन चर्चा केली.

नगरपंचायत सभागृहात सायंकाळी बैठक झाली. सहायक पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर, सुधीर चांदेलकर, आनंद तांबुळकर, विवेकानंद नाईक, मनोज पार्सेकर, राजेश फुलारी, समीर रेडकर, दिलीप आसोलकर, देवानंद हजारे, जयेश ठाकूर, स्वप्नील गवस, समीर सुतार, सुमीत म्हाडगुत, रूपेश मयेकर आणि नगरपंचायतीचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

बाजारपेठेतून भरवस्तीतील दुचाकी रविवारी (ता. १०) चोरून नेल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष चव्हाण यांनी तातडीने संयुक्त बैठक बोलावली. नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल, यावर विचारमंथन झाले. पोलिस आणि उपस्थितांनी दोन खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा विचार मांडला. त्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्याकडून महिना किमान ५० रुपये घेतले जावेत, असा मुद्दा पुढे आला. त्यावरून मतमतांतरे झाल्याने २३ एप्रिलला व्यापाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. श्री. चव्हाण यांनी वर्गणी गोळा करून सुरक्षारक्षकांना मानधन देण्याची जबाबदारी आपण घेतो, प्रत्येक रुपयाचा हिशेब सर्वांना दिला जाईल, असे जाहीर केले. माजी सैनिक किंवा कुणी स्थानिक तयार असेल, तर त्यांना सुरक्षारक्षक म्हणून संधी देण्याबाबतही चर्चा झाली.

सहायक निरीक्षक ठाकूर म्हणाले, ‘‘शक्य आहे त्यांनी दुकानात व दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावावा. त्यामुळे चोरट्यांना पकडणे सुलभ होते.’’ बाजारपेठेत येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर नगरपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही लावावेत, अशी सूचना मयेकर यांनी केली. त्यावर कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे चव्हाण म्हणाले. श्री. पार्सेकर, विवेकानंद नाईक, श्री. फुलारी आदींनी परप्रांतातून आलेल्या कामगार आणि भाडेकरूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या नोंदी त्यांच्या आधारकार्डसह संबंधित घरमालक आणि ठेकेदारांनी नगरपंचायत आणि पोलिसांकडे कराव्यात, असे आवाहन केले. त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांचे त्याकामी सहकार्य घेण्याचेही ठरले.

दोडामार्ग : नगरपंचायत सभागृहात बुधवारी झालेल्या बैठकीत बोलताना नगरसेवक चेतन चव्हाण.

भाडेकरू अनेक, शौचालय एकच

अनेक ठिकाणी भाडेकरू राहत असलेल्या घरांमध्ये भाडेकरू अनेक आहेत; पण शौचालय एक अशी स्थिती आहे. झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कामगारांना ठेकेदाराने शौचालयाची व्यवस्था करून दिलेली नाही. त्यामुळे संबंधितांना बोलावून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास भाग पाडावे, अशी सूचनाही अनेकांनी मांडली.

चला, नगर भयमुक्त करूया!

दिवसेंदिवस नगराचा विस्तार होत आहे. कामधंद्यानिमित्त अनेक जण शहराकडे येत आहेत. भविष्यात चोरी, गुन्हेगारीच्या घटना घडू शकतात. त्या रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वांच्या सहकार्याने नगर भयमुक्त करायचे आहे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com