हर्णै, पाडले, आडे समुद्रकिनारी परदेशी पाहुणे 

दापोली - हर्णै, आडे समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झालेले सीगल  (छायाचित्रे : धीरज वाटेकर) 
दापोली - हर्णै, आडे समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झालेले सीगल  (छायाचित्रे : धीरज वाटेकर) 

चिपळूण - थंडीच्या हंगामाची चाहूल लागताच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै, पाडले, आडे येथील समुद्रकिनाऱ्यांवर हजारोंच्या संख्येने सीगलचे आगमन झाले आहे. यामुळे किनारपट्टीवर विलोभनीय दृश्‍य पहावयास मिळत असून किनाऱ्याचे वैभव अधिक खुलले आहे. 

हे सीगल अमेरिका, युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून दरवर्षी कोकणात येतात. पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असे मोहक रूप असलेल्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करतात. 

कडाक्‍याच्या थंडीतून वाचण्यासाठी तुलनेने उबदार असलेल्या प्रदेशाकडे पक्षी स्थलांतरित होतात. साधारण नोव्हेंबरच्या मध्यापासून मुंबईत अनेक पाहुणे दिसण्यास सुरुवात होते. वातावरणातील बदलामुळे या पक्षांना स्थलांतर करावे लागते. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी तीन महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात. इथले उबदार वातावरण आणि त्यांचे खाद्य मासे या हंगामात किनारपट्टीवर मुबलक प्रमाणात मिळतात. यामुळे हे पक्षी कोकण किनारपट्टीचा आसरा घेतात. सीगल पक्षाने कोकण किनाऱ्यांच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी वाढते आहे. 

सुमारे 9 हजार प्रजाती 
शुभ्र पिसांचा आणि देखण्या सीगल पक्ष्यांच्या जगात सुमारे 9 हजार प्रजाती आहेत. त्यापैकी 1225 प्रजाती भारतामध्ये आढळतात. थंडीच्या कालावधीत मुबलक खाद्य, समागमासाठी अनुकूल प्रदेशामध्ये हे पक्षी स्थलांतरित होतात. समागमानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये अंडी घालण्यासाठी पुन्हा मायदेशी जातात. स्थलांतरित होणारे पक्षी सुमारे पंधरा हजार किमीचे अंतर साधारणतः तीन महिन्यांत ताशी 20 ते 25 किमीच्या वेगाने कापतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com