मिरजोळे गटात सेना-भाजपमध्ये चुरस

shivsena-bjp
shivsena-bjp

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून विशेष लक्ष नव्याने स्थापन झालेल्या गट आणि गणांकडे आहे. रत्नागिरी तालुक्‍यात मिरजोळे हा नवा गट आणि फणसवळे हा गण तयार झाला आहे. गेल्या निवडणुकीत युती म्हणून या भागामध्ये सेना-भाजपने चांगले यश मिळवले होते. राष्ट्रवादी, काँग्रेस स्पर्धेतच नाहीत. त्यामुळे शिवसेना-भाजप अशीच या गट आणि गणामध्ये लढत होणार आहे. 

जिल्ह्याच्या गट आणि गणाच्या फेररचनेमुळे मिरजोळे हा नवीन गट निर्माण झाला आहे. पूर्वी शिरगाव गटात या भागाचा समावेश होता. आता नव्या रचनेप्रमाणे हा बदल झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातील आमदार उदय सामंत उदय सामंत शिवसेनेत गेले. त्यामुळे मिरजोळेत शिवसेनेचे पारडे जड झाले. त्याचा फायदा या निवडणुकीत सेनेला होणार आहे. राष्ट्रवादीला या गटामध्ये जोरदार फटका बसल्याने उमेदवारांची शोधाशोध करावी लगणार आहे. भाजपची बांधणी या गटामध्ये चांगली आहे. यामुळे निवडणुकीमध्ये खरी लढत शिवेसना आणि भाजपमध्येच होणार आहे. या गटातून भाजपकडे विद्यमान सदस्य विजय सालीम यांचे नाव जवळजवळ निश्‍चित झाले आहे. शिवेसनेकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये वैभव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील, मिरजोळेचे माजी सरपंच विजय देसाई, भिकाजी गावडे यांच्यासह पंचायत 

समिती सभापती बाबू म्हाप देखील इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे. 

नव्या गटाबरोबर मिरजोळे व फणसवळे हे दोन गण तयार झाले आहेत. ते सर्वसाधारण महिलेसाठी राखीव पडल्याने अनेक इच्छुक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या गणातून नावे निश्‍चित झाली नसली तरी मिरजोळेत भाजपकडून स्नेहल पाटील आणि फणसवेळेत सेनेकडून सौ. सनगरे आणि भाजपकडून दळवी यांची नावे चर्चेत आहेत. मिरजोळे आणि खेडशी या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायती मिरजोळे गणामध्ये येतात. त्यावर शिवसेनेचे सरपंच असल्याने सेनेला त्याचा फायदा होणार आहे. आतापर्यंत मिरजोळे गण युती म्हणून भाजपकडे होता. यामुळे येथे भाजपचीही ताकद आहे. या गणामध्ये उपसभापती योगेश पाटील यांनी अनेक विकासकामे केली आहेत. दोन्ही पक्षांची ताकद असल्याने येथील लढत चुरशीची होईल.

मिरजोळे गटातील गावांची नावे अशी ः मिरजोळे, शीळ, मधलीवाडी, पडवेवाडी, खेडशी, फणसवळे, कोंडवीवाडी, मधलीवाडी, मजगाव, दांडेआडोम, भावेआडोम, भोके, आंबेकरवाडी, पिरंदवणे, वाडाजून, सड्ये, केळ्ये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com