शिवसेना नंबर वन! रत्नागिरी, खेड जिंकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

चिपळूण, दापोली, राजापूर त्रिशंकू
तिन्ही ठिकाणी सत्तेच्या किल्ल्या भाजपकडे
रामदास कदम, सामंत, चव्हाण यांचे वर्चस्व

चिपळूण, दापोली, राजापूर त्रिशंकू
तिन्ही ठिकाणी सत्तेच्या किल्ल्या भाजपकडे
रामदास कदम, सामंत, चव्हाण यांचे वर्चस्व

रत्नागिरी  : जिल्ह्यातील चार पालिकांपैकी दोन व एका नगरपंचायतीमध्ये त्रिशंकू अवस्था आहे. निकालाची वैशिष्ट्ये म्हणजे व्यक्‍तिकेंद्रित निवडणूक आणि आमदार उदय सामंत व आमदार रामदास कदम तसेच आमदार सदानंद चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक जिंकली. त्याचबरोबर पक्षांना बाजूला सारून लोकांना थेट आवाहन करण्याच्या ताकदीमुळे सुरेखा खेराडे चिपळूणमध्ये तर वैभव खेडेकर खेडमध्ये नगराध्यक्षपदी विराजमान झाले. रत्नागिरी व खेडमध्ये शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळवले. मात्र चिपळूण, दापोली आणि राजापूर येथे त्रिशंकू अवस्था आहे. फारशी करामत न दाखवताही भाजपच्या हातात या तीनही ठिकाणी सत्तेच्या किल्ल्या आल्या आहेत.

रत्नागिरी, खेड व चिपळुणातही शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले. रत्नागिरीतील शिवसेनेचा विजय हा प्रामुख्याने उदय सामंत यांचा विजय मानला जातो. स्वबळावर लढणाऱ्या भाजपची पिछेहाट झाली. पक्षाला गेल्या वेळेपेक्षा दोन जागा कमीच मिळाल्या. बाळ माने यांना हा व्यक्‍तिश: धक्‍का आहे. शिवसेनेला बंडाळीचा धोका आहे, असे मानले जात होते. दोन जागा शिवसेनेने त्यामुळे गमावल्याही. मात्र निवडून आलेले अपक्ष पूर्वाश्रमीचे शिवसेनेचेच शिलेदार आहेत. शिवसेनेतील जुना-नवा वाद शहरात तरी दिसून आला नाही. शिवसेनेची आणि उदय सामंत यांच्या फौजेची ताकद एकत्र आल्याने शिवसेनेने दणदणीत विजय मिळवत 19 जागा खिशात घातल्या. नगराध्यक्षपदी राहुल पंडितही आलेच. उमेश शेट्ये यांना हा चांगलाच धक्‍का आहे. पालिका सभागृहाचा आता नवा चेहरा असेल.

चिपळूण पालिकेचे निकाल म्हणजे रमेश कदम यांना धक्‍का आहे. राष्ट्रवादीतील भांडणे आणि सर्व सूत्रे कदम यांच्या हातात ठेवण्याचा अट्टहास पक्षाला नडला. भाजपने तेथे खेराडेंना उमेदवारी देऊन बहुजन समाजाचे कार्ड वापरले आणि त्याहीपेक्षा खेराडे यांचा हा व्यक्‍तिगत विजय मानला पाहिजे. या निकालाने चिपळुणातील राजकारणावरील रमेश कदम यांची पकड संपवली आहे. आमदार सदानंद चव्हाण या वेळी सक्रिय झाले होते. त्याचे प्रतिबिंब निकालात पडले. त्यामुळे शिवसेनेला तेथे दहा जागा मिळाल्या. भाजपने पाच जागा जिंकून प्रगतती साधली आहे. त्रिशंकू अवस्थेमुळे भाजपच्या हातात सत्तेच्या किल्ल्या आहेत. चिपळूण पालिकेचे राजकारण व्यक्‍तिकेंद्रित होण्याचे दिवस आता संपले आहेत. सेना 10, कॉंग्रेस 5, राष्ट्रवादी 4, भाजप 5 व अपक्ष 2 असे बलाबल असल्याने सत्तेच्या किल्ल्या येथेही भाजपच्या ताब्यात आहेत.
खेडमध्ये रामदास कदम यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि आमदार संजय कदम यांच्यापेक्षा सरस निकाल मिळवला. शिवसेनेने 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. मनसेची तेथे पिछेहाट झाली. भाजप तेथे भोपळाही फोडता आला नाही. नगराध्यक्षपदी वैभव खेडेकर यांनी आपली मोहोर उमटवली. लोकांपर्यंत थेट पोचलेला नेता अशी त्यांची प्रतिमा आता झाली आहे.

दापोलीमध्येही संजय कदम यांना धक्‍का बसला आहे. शिवसेनेने सात जागा मिळवल्या. आघाडीला आठ जागा मिळाल्या. त्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेस प्रत्येकी 4 जागा आहेत. भाजपला 2 जागा मिळाल्याने त्रिशंकू पंचायतीत भाजपला सत्तेत महत्त्वाची भूमिका मिळणार आहे. भाजपचे हेच काय ते यश मानावे लागेल.
राजापूरमध्येही सत्ता कोणाकडे हे भाजप ठरवणार आहे. शिवसेनेला 8, कॉंग्रेस आघाडीला 8 आणि भाजपला 1 जागा मिळाली आहे. हनिफ काझी कॉंग्रेसचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. भाजपची एक जागा तर येथे कमीच झाली आहे. शिवसेनेच्या जागांमध्ये तीनने वाढ झाली.

भाजपला संधी...
नैसर्गिक मित्र म्हणून शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकतात. निवडणुकीच्या ऐन तोंडावर राज्यपातळीवर युतीचा निर्णय झाला. मात्र स्थानिक पातळीवर तो मानला गेला नाही. आता राजकीय सोय म्हणून युती करून राजापूर, दापोली, चिपळूण येथे सत्ता काबीज करण्याची संधी भाजपला आहे.

ठळक
* रत्नागिरीतील विजय आमदार सामंतांचा
* खेडमधील यश रामदास कदम यांच्यामुळे
* दापोलीसह खेडमध्येही आमदार संजय कदम यांना धक्का
* चिपळुणात सत्तांतर, रमेश कदम यांचा प्रभाव संपला
* राष्ट्रवादीला अंतर्गत भांडणांची किंमत मोजावी लागली
* सौ. सुरेखा खेराडे व वैभव खेडेकरांचा व्यक्तिगत करिष्मा

जिल्ह्यातील स्थिती
शिवसेना - 52
राष्ट्रवादी- 17
भाजप- 14
कॉंग्रेस- 17
अपक्ष- 4
मनसे- 4
-----------------
एकूण 108

Web Title: sena number one in ratnagiri