महाडमधील सर्पमित्र करताहेत केरळमध्ये स्नेक रेक्स्यू ऑपरेशन 

सुनील पाटकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

वन्यजीवांना त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी महाडमधून केरळला रवाना झालेल्या आऊल्स व सीस्केप या संस्थेच्या सात जणांच्या टिमने नागरी वस्तीत शिरलेल्या सुमारे वीस सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम पूर्ण केले आहे.

महाड - देवभूमी केरळ मध्ये उद्भवलेल्या पूरस्थिती नंतर  पुरासोबत वाहून आलेले साप आणि इतर वन्यप्राणी घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव या दोघांचाही जीव धोक्यात आला आहे. या वन्यजीवांना त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी महाडमधून केरळला रवाना झालेल्या आऊल्स व सीस्केप या संस्थेच्या सात जणांच्या टिमने नागरी वस्तीत शिरलेल्या सुमारे वीस सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम पूर्ण केले आहे.

स्थानिक सामाजिक संस्था आणि वनविभाग यांची कुमक कमी पडत असल्याने वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे जोस लुईस  यांनी महाड येथील सिस्केप आणि आऊल्स या संस्थेच्या सदस्यांना या रेक्यू ऑपरेशनसाठी बोलावल्यानंतर 21 ऑगस्टला चिंतन वैष्णव, प्रणव कुलकर्णी, चिराग मेहता, योगेश गुरव (सर्व महाड) नितीन कदम, ओंकार वरणकर (रा. बिरवाडी) आणि कुणाल साळुंखे (रोहा) हे सात जण केरळ येथे गेले आहेत.  केरळ वनविभागाच्या सहकार्याने एर्नाकुलम, कोडानाड आणि चानाकुडी या भागात स्नेक रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.चिंतन वैष्णव आणि प्रणव कुलकर्णी हे दोघे एर्नाकुलम येथे, कुणाल सावंत, योगेश गुरव आणि नितीन कदम हे कोडानाड येथे तर चिराग मेहता आणि ओंकार वरणकर हे चानाकुडी येथे काम करत आहेत. केरळच्या वनविभागाने या तिनही टीमला एक वाहन आणि त्यांच्यासमवेत एक वन अधिकारी उपलब्ध करून दिला आहे.

सरकारने नागरी वस्तीमध्ये, घरांमध्ये शिरलेल्या सापांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर कॉल आल्यानंतर या टीमचे सदस्य तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून त्या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत या टीमने सुमारे वीस सापांची सुरक्षित सुटका केली असून त्यामध्ये नाग, अजगर, त्याचप्रमाणे अन्य काही विषारी सापांचाही समावेश आहे.

घरांमधील, सार्वजनिक ठिकाणांवरील चिखल साफ करण्याचे काम जसे होत आहे. तसे साप मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून, त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांत ही मोहिम अधिक गतीमान होणार आहे. - चिंतन वैष्णव (सिस्केप सदस्य)

Web Title: Serpamitra are doing Snake Rescue Operation in kerala