सर्व्हर डाउन, ऑनलाईन उमेदवारी अर्जाची प्रक्रिया ठप्प

अमित गवळे
मंगळवार, 8 मे 2018

पाली- सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी (ता.२७) पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी (ता.७) सुरवात झाली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर पुर्णपणे डाउन असल्याने उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यामुळे उमेदवार नाराज झाले.

पाली- सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी (ता.२७) पार पडणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी (ता.७) सुरवात झाली. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर पुर्णपणे डाउन असल्याने उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यामुळे उमेदवार नाराज झाले.

उमेदवारांनी पाली तहसिलकार्यालयात जावून या संदर्भात जाब विचारला. परिणामी या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी (ता.७) सकाळपासूनच ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याकरीता इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरु होती. उत्साहाने आलेल्या उमेदवारांना पहिल्या दिवशी नामनिर्देशनपत्र भरता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. या ऑनलाईन प्रक्रीयेच्या गोंधळासंदर्भात पाली तहसिलकार्यालयात विचारणा करण्यास गेलेल्या उमेदवार व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी नायब तहसिलदार वैशाली काकडे यांनी सांगितले की संपुर्ण राज्यातील सर्व्हर डाउन असल्यामुळे ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची साईट बंद आहे. या तांत्रिक कारणामुळे उमेदवारांना आपले अर्ज भरता आले नाहीत.

उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीपासूनच अर्ज भरण्याची संपुर्ण तयारी केली होती. संबधित कागदपत्रे देखिल जमा केलेली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस वाया गेला असून, मुदतीच्या वेळेपर्यंत सर्व्हर साथ देऊन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरळीत पार पडेल की नाही हीच चिंता आता प्रत्येक उमेदवाराला भेडसावत आहे.

निवडणूक कार्यक्रम
सुधागड तालुक्यातील जुन ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुक व आरक्षणाचा राज्य निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्र मागविण्याची व सादर करण्याकरीता सोमवार (ता.7) ते शनिवार (ता.१२) सकाळी ११ ते दुपारी ४.३० अशी मुदत देण्यात आली आहे. २७ मे रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे.

तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रक्रीयेत अडचणी भेडसावतात. मात्र याचा हकनाक त्रास सबंधीत उमेदवाराला भोगावा लागतो. सकाळपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खेड्यापाड्यातून उमेदवारांनी पालीत हजेरी लावली. परंतू उमेदवारी अर्ज भरता न आल्याने त्यांचा हिरमोड झाला. तसेच त्यांचा महत्वपूर्ण वेळ वाया गेला. तसेच मानसिक व शारिरीक त्रास भोगावा लागला. मी स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळपासून प्रयत्न करीत होतो. सायंकाळी उशीरा साडेसहा वाजताच्या सुमारास ऑनलाईन अर्ज स्विकारला गेला. मात्र संपुर्ण प्रक्रीया पुर्ण होऊ शकली नाही.
अनूपम कुलकर्णी, उमेदवार, ग्रामपंचायत पाली

Web Title: Server Down, Online Application Process Junk