दृष्टी अंधूक होवूनही 18 वर्षे सेवा

मुझफ्फर खान
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

दृष्टीक्षेप... 
* वीज मंडळात अपघाताने दृष्टी गेली 
* तीन वर्षे उपचारांसाठी वणवण 
* चेन्नईतील रुग्णालयाने दिले वरदान 
* कुटुंबीय, सहकाऱ्यांची साथ 

चिपळूण - डोळ्यांवर उपचार घेण्यासाठी तीन वर्षे महाराष्ट्रभर भटकंती करणारे अनंत पवार यांना चेन्नईतील प्रसिद्ध रुग्णालयातील उपचारांनी अंधूक दृष्टी मिळाली. त्यानंतर परिस्थितीवर मात करून त्यांनी महाजनकोच्या कोयना वीज प्रकल्पात 18 वर्ष यशस्वी सेवा केली. रोजंदारी कामगार, इलेक्‍ट्रिशन ब्रेकर ते आरटीशन ए (सुपरवायझर) या पदापर्यंत मजल मारणारे पवार 30 एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांचा महाजनकोकडून सत्कार केला जाणार आहे. 

पोफळी-पवारवाडी येथील अनंत केरू पवार महाराष्ट्र राज्य वीज मंडळात 1978 मध्ये रुजू झाले. मंडळाच्या स्थापत्य विभागात दहा वर्षे रोजंदारीवर सेवा केल्यानंतर 21 जुलै 1988 ला त्यांची वीज मंडळात कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नेमणूक झाली. सुरवातीचे काही वर्ष कोयना प्रकल्पाच्या पोफळी येथील टप्पा 1 मध्ये यांत्रिकी परिविभागात इलेक्‍ट्रिशन ब्रेकर या पदावर काम केले. त्यानंतर अलोरे येथील विद्युतगृहात त्यांची नेमणूक झाली. 1999 मध्ये सेवा बजावत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात लॉग टाईट केमिकल त्यांच्या डोळ्यात गेल्याने त्यांचे डोळे निकामी झाले. डोळ्यांवर उपचार करण्यासाठी ते तीन वर्ष महाराष्ट्रभर फिरले. चिपळुणातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. संजीव शारंगपाणी यांनी त्यांना चेन्नई येथे जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. चेन्नईतील नेत्र रुग्णालयात पवार यांनी 8 दिवस डोळ्यांवर उपचार घेतले. त्यानंतर त्यांना अंधूक दृष्टी मिळाली. तब्बल तीन वर्षानंतर ते पुन्हा कामावर हजर झाले. या काळात त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. मात्र, पत्नी सौ. अश्‍विनीच्या साथीमुळे त्यांनी या परिस्थितीवर मात केली. पोफळी व अलोरे विद्युतगृहाच्या यांत्रिकी व तांत्रिक विभागातील सहकाऱ्यांनी आर्थिक व मानसिक साथ दिली. पवार कामावर हजर झाल्यानंतर त्यांची कौटुंबिक घडी पुन्हा बसली. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले. गावात त्यांनी नावलौकीक मिळवला. वीज मंडळात त्यांनी एकूण 35 वर्षे सेवा बजावली. 

Web Title: Service for 18 years with vision dimmed