शरद पवार आणि कोकण एक जाणते नाते

Sharad Pawar Konkan relationship
Sharad Pawar Konkan relationship

शरद पवार यांची जाणता नेता अशी ओळख आहे. पण जाणता म्हटला की ते सगळ्यांना समान दृष्टीने पाहणारे नेतृत्व असते. पवार मात्र कोकणकडे कायम ममत्त्वाच्या भावनेनेच पाहत आले. कोकणवर त्यांच प्रेम थोड उजवच म्हणायला हव. कारण कोकणच्या फलोत्पादन पर्यटन क्षेत्रातील शाश्‍वत विकासात त्यांचे योगदान विसरताच येणारे नाही. पवार यांचा शनिवारी (ता.12) वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने कोकण आणि पवार यांचे नाते समजून घेण्याचा हा प्रयत्न.

कोकण अनेक वर्षे मागासलेला भाग म्हणून ओळखला जायचा. आता मात्र कोकणची ओळख बदलत आहे. यात पर्यटन आणि कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. हा बदल नेमका कधी आणि कोणामुळे झाला याचा शोध घ्यायचा असल्यास एक महत्त्वाचा दुवा म्हणून शरद पवारांकडे बघावे लागेल. एखादा शाश्‍वत विकास करायचा झाल्यास त्यासाठी धोरणात्मक बदल करावे लागतात. कोकणच्या बाबतीत पवार यांनी याच गोष्टीला प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यामुळे ही विकासाची फळे आजही बहरताना दिसतात. 

कोकणला अगदी अभावानेच सक्षम नेतृत्व मिळाले असे म्हणावे लागेल. याचा अर्थ कोकणातून चांगले नेते घडले नाहीत असा अजिबात नाही. मधु दंडवते, नाथ पै, भाईसाहेब सावंत, बाळासाहेब सावंत अशी कितीतरी नावे सक्षम नेतृत्व म्हणून घ्यावी लागतील. मात्र एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर केवळ नेतृत्व नाही तर आणखीही अनेक घटक जुळून यावे लागतात. यात प्रामुख्याने त्या नेतृत्वाची सकारात्मक दृष्टी, विकासासाठीची अचुक आखणी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्यस्तरावर असलेली त्या नेत्याची ‘वट’ याचा समावेश असतो. हा योग कोकणच्या बाबतीत अभावानेच जुळून आला; मात्र कोकणातील नसूनही शरद पवार यांनी कोकणच्या विकासासाठी बरेच काही केले. एखादा नेता दुसर्‍या प्रांतातील असूनही असा सकारात्मक विचार करत असेल तर ती नक्कीच जाणता नेता या संज्ञेला शोभणारी गोष्ट आहे. 

पवार यांनी कोकणच्या कृषी क्षेत्रामध्ये दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. येथील फलोत्पादन क्षेत्रात झालेल्या क्रांतीचे खूप मोठे श्रेय त्यांना जाते. बाळासाहेब सावंत कृषी मंत्री असताना कोकणात फलोत्पादन योजना राबवण्याचा प्रयत्न झाला, पण तो फारसा यशस्वी झाला नाही. पवार यांनी मात्र शंभर टक्के अनुदानावर फलोत्पादन योजना आणली आणि चित्र बदलले. याचे कारण म्हणजे या योजनेला इतर पुरक गोष्टींची जोड होती. सावंत यांच्या कारकीर्दीत प्रामुख्याने काजू लागवडीवर भर होता. या काळात काजूच्या संकरीत जाती विकसीत झाल्या नव्हत्या. त्यामुळे काजू बी लागवडीसाठी वाटली गेली. ही बी लागवडीपेक्षा खाण्यासाठीच जास्त वापरली गेली. पवार यांनी आणलेल्या योजनेबरोबरच काजू, आंबा याच्या संकरीत जातींवर संशोधन झाले. शेतकर्‍यांना काजू आंब्याची कलम उपलब्ध झाली. हजारो एकर क्षेत्र लागवडीखाली आले. या योजनांचे स्वरूप बदलत गेले; मात्र कोकणचा फलोत्पादन क्षेत्रातील प्रवास पुढे सरकतच राहिला. याला सुरूवातीला घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची कायमच साथ राहिली. 

पर्यटनाच्या बाबतीतही पवार यांचे योगदान विसरून चालणार नाही. कोकणात सुरूवातीला गणपतीपुळे (रत्नागिरी) पर्यटन स्थळ म्हणून विकसीत झाले. यात पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. तेथील प्रत्येक नियोजनामध्ये ते वैयक्तिक लक्ष घालायचे. यानंतर पर्यंटनाचे वारू पूर्ण कोकणभर पसरत गेले. त्यांच्या कारकिर्दीत एमटीडीसी मार्फतही खूप चांगले काम झाले. गणपतीपुळेच्या पर्यटन आराखड्यासाठी स्वतः पवार यांनी या भागाचा अभ्यास केला. आजही कोकणच्या पर्यटनाबाबत ते आस्थेने बोलतात. सिंधुदुर्गातही अनेक पर्यटन स्थळांच्या बाबतीत त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विकासात्मक भूमिका घेतल्याचे दिसते. कोकणातील सहकाराविषयी त्यांना विशेष रस असल्याचे अनेकदा दिसते. येथील मत्स्य शेतीच्या विकासासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. 

कोकणविषयी त्यांच्या आस्थेला आणखी एक अंग आहे. कोकणावर एखादे संकट आल्यास त्यांची भूमिका कायमच मदतीची राहिली आहे. अगदी अलिकडे आलेल्या निसर्ग वादळावेळीही ते आवर्जुन रायगड आणि रत्नागिरीच्या दौर्‍यावर आले होते. त्यांनी आपतग्रस्तांचे अश्रु पुसण्याचे प्रयत्न केले. कोकणातील कार्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम अनेक कार्यक्रम, मेळावे, सभांमधून प्रकर्षाने दिसते. अनेक कार्यकर्ते आजही थेट पवार यांना भेटू शकतील इतके त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेक सभांमध्ये पवार यांनी गर्दीत असलेल्या एखाद्या कार्यकर्त्याला पूर्ण नाव घेवून जवळ बोलावल्याचे किस्से आजही कोकणातील बहुसंख्या शहरांमध्ये सांगितले जाते. कोकणची भौगोलिक परिस्थिती सोडाच येथील रस्ते, वाटा सुध्दा त्यांना पाठ असल्याचे प्रसंग अनेक कोकणवासियांनी अनुभवले आहे.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितलेला एक प्रसंग कोकणातील कार्यकर्त्यांविषयी त्यांच्या भावना सांगायला पुरेसा आहे. साधारण 18 ते 20 वर्षापूर्वी श्री. साळगावकर यांच्यासह सावंतवाडीतील काही नगरसेवक विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली पवार यांना दिल्लीत भेटायला गेले होते. डिसेंबरचा तो कालावधी होता. कडाक्याची थंडी होती. भेटीची वेळ सकाळी सातची होती. साडेसहालाच हे सर्वजण दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. इतक्या मोठ्या नेत्याला भेटायला जायचे असल्याने बहुसंख्य जणांनी स्वेटर टाळला होता. केवळ पांढरे कपडे घातले होते; मात्र अति थंडीमुळे ते कुडकुडत होते. पवार यांनी ही स्थिती ओळखून त्यांना आधी हिटर रूममध्ये थांबण्याची व्यवस्था केली. त्या सगळ्यांची आस्थेने चौकशी केली. हा प्रसंग लहान असला तरी त्यांच्या वात्सल्याचा दाखला देणारा आहे. 

पवार यांचा कोकण दौरा प्रामुख्याने गाडीतून असतो. ते शक्यतो हॅलिकॉप्टरचा प्रवास टाळतात. याचे कारण म्हणजे या प्रवासात त्यांना अनेकांना भेटता येते. जनसंपर्क वाढवण्याबरोबरच कोकण समजून घ्यायलाही मदत होते. अनेकदा ते हॉटेल किंवा सरकारी विश्रामगृहावर न थांबता कार्यकर्त्याच्या घरी थांबायला पसंती देतात. कोकणशी नात घट्ट करणार्‍या या सवयी कोकणवासीयांनाही आता पाठ झाले आहे. 

कोकण आणि पवार यांचे हे नाते खूप वेगळे आणि न तुटणारे आहे. यात कुठेही मतांचे किंवा राजकारणांचे गणित नाही. केवळ एक आत्मियता आहे. यामुळेच फारसा राजकीय फायदा नसुनही पवार यांनी कोकणवर कायमच प्रेम केले. 


असेही नाते
जुन्या पिढीतील अनेक बागायती क्षेत्र, तिथल्या वाटा, तिथली कष्टकरी माणसे शरद पवारांना तोंडपाठ होती. ही आख्यायीका नाही. 2003 मध्ये गणपतीपुळे येथे झालेल्या मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात याची प्रचिती तिथे उपस्थिती असलेल्यांना आली होती. काही जुन्या कार्यकर्ते आणि शेतकर्‍यांना पवारांनी स्वतः स्टेजजवळ केवळ बोलवलेच नव्हते तर त्यांच्या बागा कुठे आहेत याचे वर्णनही सांगितले होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com