विरोधकांचे पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीत - शेखर निकम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

आगामी विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. संगमेश्‍वर तालुक्‍यात राष्ट्रवादीत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे इनकमिंग नियमितपणे वाढत आहे. आगामी काळातही विरोधी पक्षातील बडे पदाधिकारी राष्ट्रवादीत दिसतील,असे सूचक वक्तव्य शेखर निकम यानी केले. 

चिपळूण - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी किती मताधिक्‍य मिळाले, या चर्चेत फार गुंतून जाऊ नये. आगामी विधानसभेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. संगमेश्‍वर तालुक्‍यात राष्ट्रवादीत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचे इनकमिंग नियमितपणे वाढत आहे. आगामी काळातही विरोधी पक्षातील बडे पदाधिकारी राष्ट्रवादीत दिसतील,असे सूचक वक्तव्य शेखर निकम यानी केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निकम सावर्डे येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.  कडवई गटातील कार्यकर्त्यांनी भरघोस मताधिक्‍य देऊन विरोधकांच्या भ्रम दूर करावा,असे आवाहन त्यांनी केले. कडवई जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.

मेळाव्यास कडवई, नायरी,तिवरे, निवळी, काळभाटणे, शृंगारपूर, हेदली, आंद्री आदी गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. निकम म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत कडवई गटात आपण कमी पडलो. मात्र आजच्या उपस्थितीमुळे कडवई गटातील ताकद दिसली आहे. विरोधी पक्षाकडून कडवई गटातून मोठे मताधिक्‍य घेणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून विरोधकांचा भ्रम दूर करावा. चिपळूण मतदारसंघातील विविध गावातील समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. भाजप सरकारच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील विकास रखडला.मूलभूत सुविधांसाठीही शासन निधी देत नाही.

गेल्या काही महिन्यापासून विरोधी पक्षातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यापुढेही ते कायम सुरू राहील.यावेळी माजी सभापती शौकत मुकादम, विजय गुजर, आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्यास विवेक शेरे, राजू पोमेंडकर, रमेश डिके, संतोष भडगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

30 हजाराचेच मताधिक्‍य 
लोकसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघात 57 हजाराचे मताधिक्‍य मिळाल्याचा गाजावाजा महायुतीकडून केला जातो. मात्र आपल्या दृष्टीने 30 हजाराचेच मताधिक्‍य आहेत. खंबीर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बळावर हे मताधिक्‍य मोडीत काढता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Nikam comment