उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच ; मंत्रिपदाबाबत मात्र येणारा काळच उत्तर देईल
राजकारणापेक्षा राहिलेल्या चार वर्षात जनतेची कामे करायची एवढेच डोक्यात आहे.
चिपळूण (रत्नागिरी) : माझे कोणाबरोबर भांडण नाही. कार्यकर्ता बांधण्याचे काम मी करत आहे. मंत्रिपद मिळेल की नाही, पुढचा उमेदवार कोण असेल याबाबत येणारा काळच उत्तर देईल. राजकारणापेक्षा राहिलेल्या चार वर्षात जनतेची कामे करायची एवढेच डोक्यात आहे. वर्षभरात मिळालेली मानधनची रक्कमही जनसेवेसाठी खर्च केली, अशी माहिती चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी वर्षपूर्तीनिमित्त ‘सकाळ’ला दिली.
हेही वाचा - दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव कवडीमोल दराने -
कोरोनाचा प्रभाव संपत असताना चिपळूण तालुक्यात शिवसेना पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नुकताच जिल्हा दौरा झाला. या वेळी आमदार निकमांना मंत्रिपद देण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद सांधला असता ते म्हणाले, माझी मंत्रिपदाची इच्छा असली तरी माझ्यापेक्षा वरिष्ठ असलेले महाविकास आघाडीतील आमदार स्पर्धेत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझे संबंध घनिष्ठ आहेतच तसेच अनेकांचे आहेत. प्रत्येकाला मंत्रिपद देणे शक्य होत नाही. येणारा काळच त्याबाबत उत्तर देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझा पूर्वी संपर्क नव्हता. दोनवेळा फोनवर चर्चा झाली होती. आमदार झाल्यानंतर मी त्यांना जवळून पाहतोय. ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. संकट काळातही शांत आणि संयमाने परिस्थितीला सामोरे जाण्याची कला त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.
बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर आहेत. सर्वपक्षीय लोकांना एकत्र आणून ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. जिथे एकमत होणार नाही. तिथला निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवला जाईल, असे निकम यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - यंदा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या कृषी प्रदर्शनाला ब्रेक -
..ही माझी जबाबदारी
चिपळूणचा विचार करता शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. लोकसभा निवडणुकीत चिपळुणातून खासदार विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले होते. मी निवडून येणार नाही, असा काहींचा समज होता. परंतु मतदारांनी तो खोटा ठरवला. चांगल्या फरकाने निवडून आलो. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी जबाबदारी आहे. मला मिळालेल्या मानधनाची रक्कमही मी जनसेवेसाठी खर्च केली, असे निकम यांनी सांगितले.
संपादन - स्नेहल कदम