शेखर निकम म्हणाले, शेवटपर्यंत यांच्यासोबत...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

शरद पवार कुटुंबियांवरील माझे प्रेम स्वार्थासाठी नाही. राजकारणात काम करत असतांना सर्वांशी चांगले संबंध राखणे आवश्‍यक आहे. अजित पवार यांच्याशी माझे घरचे आणि मैत्रीचे नातेसंबंध आहेत. त्याचा कोणीही वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, असे मला यानिमित्ताने वाटते. 
- शेखर निकम, आमदार चिपळूण

चिपळूण - कोणी कितीही आमिषे किंवा भीती दाखवली तरी मी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहणार आहे, अशी भूमिका चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केली. 

निकम म्हणाले, ‘‘पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कै. गोविंदराव निकम दोघांचे विचार एकच. केंद्रात असताना दोघेही एकाच विचाराने चालायचे. पवार व निकम दोघांनी नेहमीच महाराष्ट्राचे हित पाहिले. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर त्यांच्याबरोबर जाण्याचा कोकणातून पहिला निर्णय गोविंदराव निकमांनी घेतला होता. कितीही संकटे आली तरी पवार यांची साथ सोडू नको, अशी शिकवण मला घरातून मिळाली. त्यामुळे मी निकम पवार यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणार आहे. शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाही. 

हेही वाचा - शिवसेनेला कोकण राखण्याचे आव्हान 

भाजपकडून मोठी ऑफर

विधानसभा निवडणुकीच्या काळात मला भाजपसारख्या मोठ्या पक्षाकडून ऑफर होती. भाजपमधील काही नेत्यांनी मला पक्षात येण्याचा आग्रह केला होता. मात्र, मी त्या काळात भाजपमध्ये गेलो नाही. मला अनेक प्रकारची भीतीही दाखवण्यात आली होती. मी त्यावेळी कुठल्याही पक्षात गेलो असतो तरी, पवार यांचे माझ्यावरील प्रेम कायम राहिले असते. आमदार म्हणून निवडून आणण्याचा शब्द त्यांनी मला वेळोवेळी भेटीदरम्यान दिला होता. शरद पवार यांच्यावरील प्रेमामुळे मी राष्ट्रवादीत राहिलो. जिल्ह्यातील विरोधी वातावरण असताना मी निवडून आलो. त्यामुळे आता अन्य पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. पक्षाच्या चिन्हावर मी निवडून आलो आहे. त्यामुळे पक्षातच राहणार आहे.

हेही वाचा - सांगलीत होता अजितदादांचा मोठा गट

अजित पवार यांच्याशी माझे घरचे संबंध

शरद पवार कुटुंबियांवरील माझे प्रेम स्वार्थासाठी नाही. राजकारणात काम करत असतांना सर्वांशी चांगले संबंध राखणे आवश्‍यक आहे. अजित पवार यांच्याशी माझे घरचे आणि मैत्रीचे नातेसंबंध आहेत. त्याचा कोणीही वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, असे मला यानिमित्ताने वाटते. 
- शेखर निकम, आमदार चिपळूण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Nikam Say I Am With Sharad Pawar