परदेशी जहाज बंदरात आले खरे, पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

प्रशासनाचा जमाव बंदी आदेश असतानासुद्धा रेडी पोर्ट आणि शासकीय अधिकाऱ्यांनी परदेशी जहाज रेडी बंदरात दाखल करून घेतलेच कसे

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - "कोरोना' प्रादुर्भावच्या भीतीने रेडीत एम. व्ही. नॉटिकल गॉर्जिता नामक परदेशी जहाजाला स्थानिक ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आला. जहाज रेडी पोर्टवर आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जहाज रेडी पोर्ट हद्दीबाहेर ठेवण्यात आल्याची माहिती रेडी ग्रामपंचायत सदस्य नामदेव राणे यांनी दिली. 

रेडी बंदरावर परदेशी जहाज आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. रेडी उपसरपंच सायली पोखरणकर यांच्यासहीत सदस्य तसेच ग्रामस्थांनी जाऊन रेडी पोर्ट अधिकारी शेणॉय, संदीप चौहान, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अधिकारी वेंगुर्लेकर, कस्टम अधिकारी भिसे यांना जाब विचारत त्वरित काम बंद करण्यास सांगितले. 

प्रशासनाचा जमाव बंदी आदेश असतानासुद्धा रेडी पोर्ट आणि शासकीय अधिकाऱ्यांनी परदेशी जहाज रेडी बंदरात दाखल करून घेतलेच कसे व त्यावर माल भरण्याचे काम सुरू केले कसे, असा सवाल स्थानिकांनी विचारला. रेडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने कामास जोरदार विरोध केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ship issue at Ready Port