राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक : शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या संपर्कातील यादी वाढणार...सविस्तर वाचा..

विनोद दळवी | Saturday, 25 July 2020

पारकरांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध; जिल्ह्यात आणखी सहा बाधित

कणकवली (सिंधुदुर्ग) : आमदार वैभव नाईक आणि शिवसेना नेते संदेश पारकर यांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या दोहोंच्या हायरिस्कमध्ये आलेल्या व्यक्‍तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी आणि स्वॅब नमुने घेण्याची कार्यवाही आरोग्य विभागाकडून केली जात आहे. राजकीय कार्यकर्त्यांमधील धाकधूक वाढली आहे. शहरातील बाजारपेठ आणि सिद्धार्थनगरमध्ये ५० मीटरचा कंटेन्मेंट झोन होणार आहे. शहरालगतच्या कलमठ कुंभारवाडीमध्येही कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथे कंटेन्मेंट झोन केला जाणार आहे. तालुक्‍यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे.

शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर पारकर यांचे निवासस्थान, तसेच सिद्धार्थनगरमधील कोरोना बाधित रुग्णाचे निवासस्थान आज नगरपंचायतीच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. याखेरीज संपूर्ण बाजारपेठ, राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्ते देखील निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. आरोग्य यंत्रणेने आज पारकर यांचे निवासस्थान परिसर, सिद्धार्थनगर आणि कलमठ कुंभारवाडी भागात जाऊन आरोग्य सर्वेक्षण केले. याखेरीज आमदार नाईक आणि पारकर यांच्या निकटच्या आणि अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्‍तींची यादी केली जात असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. तर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी  नगरपंचायतीच्या वतीने शहरातील सर्व प्रभागात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा- कोव्हिड योद्धाचा निर्णय :  या बालरोगतज्ञांनी प्रशासनाला दिले पत्र..का वाचा... -

पालकमंत्री उदय सामंत यांनी १५ जुलैला नरडवे धरणाची पाहणी, शहरातील भालचंद्र आश्रम, आचरेकर प्रतिष्ठान, एसटी बसस्थानकांना भेटी दिल्या होत्या. याखेरीज महामार्गावरील कोसळलेल्या भिंतीचीही पाहणी केली होती. या दौऱ्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याखेरीज विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशीही पालकमंत्री सामंत, आमदार नाईक, श्री. पारकर यांची चर्चा केली होती. नाईक, पारकर यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजकीय कार्यकर्त्यांसह, संस्था पदाधिकाऱ्यांमध्येही धाकधूक वाढली आहे.

हेही वाचा- मिटुनी लोचने गाणारा दीप जोशी ठरला पहिला आयडॉल : ३८ जणांनी घेतला होता सहभाग... -

आमदार नाईक यांच्या संक्रमणाचा ट्रेस नाहीच
आमदार नाईक २० जुलैला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर चार दिवस उलटले तरी आमदार नाईक यांना कोरोनाचे संक्रमण कोणामुळे झाले ? हे शोधण्यात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला यश आलेले नाही. त्यामुळे नाईक यांचे संक्रमण सोशल स्प्रेड तर नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 
 

संदेश पारकर यांच्या संपर्कातील यादी वाढणार
आमदार नाईक यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध संपलेला नसताना पारकर यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आली आहे. पारकर हे १७ जुलैपासून कणकवली शहरासह जिल्ह्यात फिरले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील यादी वाढणार आहे.

हेही वाचा-सभापती विशाखा लाड यांनी प्रशासनाला दिले आदेश : या आठ शिक्षकांवर होणार  कडक कारवाई  का वाचा... -

सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवित असताना आम्हाला कोरोना किंवा अन्य साथरोगाची लागण झाली, तर त्यात घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कारण आपणा सर्वांना कोरोनासोबतच जगायचे आहे. औषधोपचाराने हा रोग बरा होतो. त्यामुळे कुणीही काळजी करू नये; मात्र कोरोनाचा मुद्दा पुढे करून कुणी कुणाची राजकीय बदनामी करू नये.
- संदेश पारकर, युवा नेते शिवसेना.

 

सहा पॉझिटिव्ह   
जिल्ह्यातील आणखी ६ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण तपासण्यात आलेल्या ११६ नमुन्यांपैकी ६ पॉझिटिव्ह आणि १०८ निगेटिव्ह आले आहेत, तर २ पेंडिंग आहेत.

संपादन - अर्चना बनगे