चिपळूण : मोबाईल रेंज नसल्याने जाधवांबाबत गैरसमजूत

तुरंबवमध्येच डेरा; पक्ष सोडलेला नसल्याचे आमदार जाधव यांचे स्पष्टीकरण
shiv sena leader bhaskar jadhav criticism
shiv sena leader bhaskar jadhav criticism sakal

चिपळूण : मुंबईतून निघालेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव गुवाहाटीला पोहोचल्याची अफवा पसरली होती; परंतु त्यांनी माध्यमांसमोर येऊन मी गुवाहाटीला नव्हे, तर गावातच आहे हे सांगितले. पक्षाला माझी गरज असेल, तेव्हा मी मुंबईत जाईन, असेही त्यांनी सांगितले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेतील एकेक आमदार त्यांच्या गोटात सामील होत आहे. रात्री ठाकरे कुटुंबीयांबरोबर असणारे आमदार दुसऱ्या दिवशी शिंदेंच्या गोटात सामील होत आहेत. असे चित्र असताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आपला मुक्काम मुंबईतून हलवला. बंधूवर झालेली शस्त्रक्रिया आणि शेतीच्या कामासाठी भास्कर जाधव चिपळुणात दाखल झाले. तेथून ते तुरंबव येथील आपल्या गावी निघून गेले. तेथे मोबाईलची रेंज नसल्यामुळे भास्कर जाधवही गुवाहाटीला गेल्याची अफवा पसरवण्यात आली. अखेर त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, मी अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे. मला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून राहणे आवडत नाही. मी शेतकरी असल्यामुळे शेतीची कामे आणि कौटुंबिक कामांसाठी घरी आलो आहे. गावी मोबाईलची रेंज नसल्यामुळे फोन लागत नाही. त्यामुळे मी नॉट रिचेबल होतो. याचा अर्थ मी पक्ष सोडलेला नाही. ज्यावेळी माझी पक्षाला गरज लागेल, त्यावेळी मी मुंबईत जाईन. तीन अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद का दिले गेले.

नेत्यांना कमी निधी मिळाला, हे अमान्य

ते पुढे म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना कमी निधी मिळाला, हे मला मान्य नाही. कारण सरकार आपले आहे. अर्थ खाते हे सर्वांनी मिळून चालवण्याचे खाते आहे. अर्थमंत्री अजित पवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात बसलेले असायचे. त्यांनी आपल्या स्टाईलने काम केले असले तरी अर्थ खात्याकडून कुणाला किती निधी मिळाला, याची तपासणी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फडणवीस मुख्यमंत्री असताना सेना आमदारांना किती निधी मिळत होता, ठाकरे सरकारच्या काळात किती निधी मिळाला, याचेही आत्मपरीक्षण शिवसेनेच्या आमदारांनी केले पाहिजे.

उदय सामंत ज्येष्ठांच्या भूमिकेत

सध्याची वेळ आव्हान द्यायची नाही, तर बंडखोर आमदारांना भावनिक साद घालायची आहे. त्यांना प्रेमाची हाक द्या. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार टिकेल, असा दावा सकाळी भास्कर जाधव यांनी केला. त्यानंतर सायंकाळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे सकाळी भास्कर जाधव आणि सायंकाळी उदय सामंत ज्येष्ठांच्या भूमिकेत दिसले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com