Ratnagiri : शिवसेना सोडणारे ना घर के- ना घाट के ; आमदार कदम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 MLA yogesh kadam said in ratnagiri

शिवसेना सोडणारे ना घर के- ना घाट के ; आमदार कदम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड : ज्यांना पक्षाने पद, प्रतिष्ठा, सन्मान दिला, असेच गद्दार निघाले. त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. फक्त आणि फक्त समाजाला वेठीस धरून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्‍यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. परंतु त्यांची आता ना घर का- ना घाट का, अशी स्थिती झाली आहे. स्वार्थासाठी पक्ष सोडला, त्यांची रामदास कदम यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. गेले दोन -चार महिने सोशल मीडियावर विविध मॅसेज टाकून, रेकॉर्डिंग क्लिप टाकून फक्त बिनबुडाचे आरोप करण्याचे काम सुरू आहे. यामुळे कदम यांना काहीही फरक पडणार नाही, अशा शब्दात आमदार योगेश कदम यांनी पक्ष सोडणाऱ्याना फटकारले.

खेड येथे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. गेल्या दोन-चार महिन्यात शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर झालेले आरोप आणि त्यामुळे निर्माण झालेला राजकीय गोंधळ यामुळे सैरावैरा झालेला सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने निश्‍चितच स्थिर झाला. कारण युवासेना प्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार कदम यांचे मैत्रिपूर्ण संबंध साऱ्यांना माहिती आहेत. त्यामुळे कुणीही कितीही कागाळ्या करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील ठाकरे आणि कदम कुटुंबीयांच्या नातेसंबंधामध्ये तसूभरदेखील कटूता येणार नाही, असा विश्‍वास मंत्री सामंत यांनी जाहीरपणे व्यक्त केला.

मतदारांनी चुना लावला

२५वर्षे शिवसैनिकांच्या जिवावर आमदारकी उपभोगून पान खाणाऱ्यांना २०१४ च्या विधानसभेला मतदारांनी चुना लावला. कोणतेही विकासकाम नाही. केवळ आश्‍वासने देणाऱ्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली आहे, अशी टीका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे नाव न घेता, उदय सामंत यांनी केली. सेनेत येण्यासाठी धडपड सुरू आहे, त्यांना आता पुन्हा पक्षात प्रवेश मिळणार नाही, असा टोला सामंत यांनी नाव न घेता, माजी आमदार संजय कदम यांना हाणला.

loading image
go to top