नाराज शिवसैनिकांचा फैसला "मातोश्री'वर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक रिंगणात उतरण्याच्या तयारीत, तर दुसरीकडे ज्येष्ठ सदस्य व निकटवर्तीयांना आणि कानामागून येऊन तिखट झालेल्यांना संधी देण्याच्या धोरणाने कार्यकर्ते बिथरले आहेत. हा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना उमेदवारांची यादी "मातोश्री'वर पाठविण्यात आली आहे. ती 28 जानेवारीपूर्वी पालकमंत्री जाहीर करणार आहेत. शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने याला दुजोरा दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा तिढा सोडविताना स्थानिक पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची तारांबळ उडाली आहे. उमेदवार निवडीच्या पारदर्शक प्रक्रियेसाठी शाखाप्रमुखांचे मत जाणून घेण्यात आले. त्यांच्या मुलाखती इनकॅमेरा घेण्यात आल्या होत्या. जिल्ह्याच्या उत्तर भागात रामदास कदम, सूर्यकांत दळवी यांचा वाद उफाळून आला आहे. त्याचा फटका या निवडणुकीत बसू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दक्षिण भागात स्थानिक उमेदवारांना बाजूला ठेवून नेत्यांची प्यादी पुढे सरकावली जात आहेत. त्यातून अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. या वेळी कॉंग्रेस आघाडीपेक्षा शिवसेनेला भाजपचे आव्हान आहे. त्यांना काटशह देण्यासाठी शिवसेना ताकही फुंकून पित आहे.

शिवसेनेची पहिली यादी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी जाहीर करण्यात येणार होती; परंतु अंतर्गत वाद मिटलेले नसल्याने त्याच मुहूर्तावर तंटाबखेडा निर्माण होऊन चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांनी मुहूर्त पुढे ढकलला. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून उमेदवार यादी जाहीर न करता ती "मातोश्री'वर पाठविण्यात आली आहे. तेथूनच यादी मंजूर केली जाणार आहे. उमेदवारांची घोषणा पालकमंत्र्यांमार्फत केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पालिका निवडणुकीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना निवडणुकीत लक्ष घालावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही पावले उचलण्यात आली आहेत.

जातीय समीकरणांचे आव्हान
रत्नागिरी तालुक्‍यात काही ठिकाणी शिवसैनिकांमध्ये नवे-जुने वाद उफाळण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर काही गटांमध्ये कुणबी समाजाचे मोठे प्राबल्य आहे. अनेक ठिकाणी कुणबी समाजाच्या इच्छुक उमेदवारांना डावलण्यात येत असल्याचा संदेश गेला आहे. जातीय समीकरणांचा समतोल साधण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे राहणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढविल्या जात आहेत.

Web Title: Shiv Sena upset candidate decision on matosri