शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांचा समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र

अमित गवळे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

अनुपम कुलकर्णी यांचे समर्थक महेश खंडागळे यांनी पाली शिवसेना शहर प्रमुखपदाचा राजीनामा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांच्याकडे सुपुर्द केला आहे.  
 

पाली (जि. रायगड) - येथील अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे संस्थापक आणि शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी यांनी आपल्या समर्थक सहकार्‍यांसोबत गुरुवारी (ता. 20) शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि आश्वासनांची पुर्तता न झाल्याने शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच अनुपम कुलकर्णी यांचे समर्थक महेश खंडागळे यांनी पाली शिवसेना शहर प्रमुखपदाचा राजीनामा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांच्याकडे सुपुर्द केला आहे.  

विशेष म्हणजे अनुपम कुलकर्णी यांनी जुलै महिन्यातच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोनच महिन्यात सुधागड शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, हेवेदेवे व प्रवेशा प्रसंगी दिलेल्या विकासकामांच्या आश्वासनांची पुर्तता न झाल्याने शिवसेनेतून ते बाहेर पडले आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी आणि हेवेदावे चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना पक्षातील अंतर्गत गटबाजी व प्रवेश करीत असताना पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. आमचे व्हिजन विकासाचे आहे. पाली नगरपंचायत व्हावी व पालीचा सर्वांगिण विकास व्हावा ही समस्त पालीकरांची तसेच अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाची प्रामाणिक इच्छा आहे असे अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले.

पालीचा सर्वांगिण व शास्वत विकास व्हावा, येथील जनेतला मुलभूत व नागरीसेवा सुवीधा देणेकामी जो राजकीय पक्ष पुढाकार घेईल त्या पक्षात आगामी काळात सर्व सहकार्‍यांच्या विचारविनीमयाने प्रवेश करीन असे कुलकर्णी म्हणाले.  मात्र कितीही मनधरणी झाली तरी शिवसेनेत पुन्हा जाणार नाही अशी भुमिका कुलकर्णी यांनी स्पष्ट केली आहे.

यावेळी अनुपम कुलकर्णी यांच्यासह अनुपम कुलकर्णी मित्रमंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर, उपाध्यक्ष वैभव मोहिते, महेश खंडागळे, रितेश मिसाळ, मिलिंद थळे, गोरख माळी, वैभव जोशी, मंगेश ठोंबरे, निलेश पवार, किरण चव्हाण, स्वप्णिल भुरे, अमोल कुंभार, अविनाश परब, अभिजीत सावंत, सुनिल भोनकर, आदिंसह मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थीत होते.

 

Web Title: Shiv Sena youth leader Anupam Kulkarni left the Shiv Sena with supporters