​गुहागर तालुक्यात शिवसेनेत गटबाजी

मयुरेश पाटणकर
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

गुहागर - तालुक्यातील शिवसेनेमध्ये गटबाजीपूर्वीपासून होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर अधुनमधून गटबाजीचे रंग अधिकाधिक गडद होत आहेत. तालुकाप्रमुख महेश नाटेकर यांना पक्षबांधणी करताना या गटबाजीचा सामना प्रत्येकवेळी करावा लागत आहे. 

गुहागर - तालुक्यातील शिवसेनेमध्ये गटबाजीपूर्वीपासून होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर अधुनमधून गटबाजीचे रंग अधिकाधिक गडद होत आहेत. तालुकाप्रमुख महेश नाटेकर यांना पक्षबांधणी करताना या गटबाजीचा सामना प्रत्येकवेळी करावा लागत आहे. 

तालुक्यात शिवसेनेचे खासदार अनंत गीते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम असे दोन गट सक्रिय आहेत. 2014 मध्ये लोकसभा निवडणूका झाल्यानंतर उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुखपदी सचिन कदम आणि महेश नाटेकर या अनंत गीते गटातील कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली. सचिन कदम विधानसभेसाठी इच्छुक असून त्यादृष्टीने त्यांनी संपर्क वाढविला आहे. 

बेटकरांच्या उमेदवारीवरून वाद

साहित्य संमेलानासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर गुहागरमध्ये आले असता जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी काही शिवसैनिकांनी केली. त्यावरुन जिल्हा प्रमुख सचिन कदम आणि पाटपन्हाळे शहरप्रमुख नरेश पवार यांच्यात वाद झाला. या वादाला आणखी एक घटना कारणीभूत ठरली. तालुकाप्रमुख महेश नाटेकर यांनी एका कार्यकर्त्यांजवळ बोलताना विरोधी गटातील शिवसैनिकांबाबत केलेल्या विधानांचे रेकॉर्डिंग संबधितांपर्यंत पोचले. त्यामुळे दोन गटात अंतर्गत धुसफुस सुरू होती. 

गीते-कदम यांच्यातील वाद मिटला. तसे चित्र निर्माण करण्यात दोघेही यशस्वी झाले. मात्र त्यांच्या समर्थकांमधील 2009 च्या निवडणुकांपासूनचा वाद संपताना दिसत नाही. महेश नाटेकर यांनी राष्ट्रवादीचे वादळ थांबवून तवसाळ गटात सेनेला विजय मिळवून दिला. तरीही संघटनेतील वाद थांबवण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे वाद यापुढील काळात अधिक गडद होण्याची शक्यता आहे. 

“संघटनेतील वाद हे पेल्यातील वादळ आहे. पेल्यातच मिटेल.” 

- सचिन कदम, जिल्हाप्रमुख

“संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर चालते. वर्षानुवर्ष काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या काही मागण्या असतात. त्यांचा आदर केला पाहिजे. माणसे म्हटल्यावर वाद आलेच. हे अंतर्गत वाद संघटनेचे कार्यकर्तेच मिटवतील.” 

- सहदेव बेटकर, शिक्षण सभापती, जि.प. रत्नागिरी

Web Title: Shivaji Sena grouping in Guhagar taluka