शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रमी रायगडावर

सुनील पाटकर
बुधवार, 6 जून 2018

महाड - आज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लाखों शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पावसाळी वातावरण, घाटातील वाहतूककोंडी तसेच रायगडावरील अनेक गैरसोयी या सर्वांना तोंड देत शिवराज्याभिषेक दिन सोहळा पाहण्यासाठी आणि रायगडची वारी करण्यासाठी लाखों शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. 

महाड - आज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा लाखों शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पावसाळी वातावरण, घाटातील वाहतूककोंडी तसेच रायगडावरील अनेक गैरसोयी या सर्वांना तोंड देत शिवराज्याभिषेक दिन सोहळा पाहण्यासाठी आणि रायगडची वारी करण्यासाठी लाखों शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. 

या सोहळ्यासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली अशा विविध भागातून लाखों शिवप्रेमी गडावर आले होते. गेल्या दोन दिवसांपासून रायगड परिसरात पावसाळी वातावरण आहे. तरीही गडावर दाखल झालेल्या शिवप्रेमींची संख्या मोठी होती. महाराजांचा राज्याभिषेक पाहू न शकलेली आजची पिढी शिवराज्याभिषेक दिन सोहळा तरी पाहता यावा यासाठी आसुसलेली दिसत होती. आणि हीच ओढ त्यांना रायगडाकडे नेत होती. नाते खिंडीपासून रायगडचा २५ किलोमीटरचा परिसर भगवामय झाला होता. बसेस, चारचाकी व दुचाकी अशा हजारों गड्या रायगडवारीला निघाल्या होत्या. 

शेतामध्ये, पटांगणामध्ये, रस्त्याच्या कडेला जेथे शक्य होईल तेथे वाहने उभी केलेली होती. बंद टप-यांच्या बाहेर, मंदिरामध्ये तर काही ठिकाणी अक्षरशः रस्त्यावरही शिवप्रेमींनी आपली रात्र घालवली होती. याच ठिकाणी नदीवर नाहीतर विहीर किंवा विंधन विहीरीच्या पाण्यावर अंघोळ करून शिवप्रेमी वाहतूकीच्या कोंडीचा सामाना करत गडावर पोहोचले होते. कोंझर ते पाचाड हा सुमारे तीन किमीचा परिसर वाहनांनी गच्च भरून गेल्याने मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. तरीही दूरदूर वरून आलेल्या शिवप्रेमींनी वाळसुरे, कोंझर, वाडा या चार ते पाच किमी अंतरावर आपली वाहने उभी करून तेथून रायगडच्या पायथ्यापर्यंत पायी व त्यानंतर तब्बल चौदाशे पाय-यांचा गड चढून शिवराज्याभिषेक दिन सोहळा पाहण्यासाठी आले होते. रोप वे ने जाणा-या शिवप्रेमींनाही दोन ते तीन तास रोप वे साठी प्रतिक्षा करावी लागली होती. पिण्याच्या पाण्याची गैरसोय, निवास व्यवस्था नसल्याने कुठेही राहण्याची तयारी अश्या अत्यंत कष्टमय प्रवासानंतर शिवप्रेमींना फूलांनी सजवलेल्या मेघडंबरीतील शिवरायांचे दर्शन झाले. केवळ महाराजांच्या ओढीने आपण गडावर आलो असल्याचे अनेक पर्यटकांनी यावेळी सांगितले. गडावरील शिवराज्याभिषेकाचा देखणा सोहळा, शाहीरी पोवाडे, मर्दानी खेळ, हे सारे अनुभवल्यानंतर त्यांचा क्षीण निघून गेला आणि शिवराज्याभिषेक दिनाची शिदोरी सोबत घेत अनेक शिवप्रेमींनी परतीचा प्रवास सुरू केला.

Web Title: shivrajyabhishek sohola at raygad