आमदार राजन साळवीं विरुद्ध शिवसैनिकांचे बंडाचे निशाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

लांजा - आमदार राजन साळवी हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. तालुक्‍यात विकासकामे, शैक्षणिक सुविधा यांची ओरड असून, आमदार अकार्यक्षम ठरत आहेत, अशी टीका तालुक्‍यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. उघडपणे बंडाचे निशाण फडकावताना पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांनी आमदार साळवी यांच्याबाबत असलेली नाराजी उघड केली. 

लांजा - आमदार राजन साळवी हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. तालुक्‍यात विकासकामे, शैक्षणिक सुविधा यांची ओरड असून, आमदार अकार्यक्षम ठरत आहेत, अशी टीका तालुक्‍यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. उघडपणे बंडाचे निशाण फडकावताना पत्रकार परिषद घेऊन शिवसैनिकांनी आमदार साळवी यांच्याबाबत असलेली नाराजी उघड केली. 

आपली ही नाराजी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली असून विधानसभा निवडणुकीत आमदार राजन साळवी यांना तिकीट देण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील केली असल्याचे सांगण्यात आले. आमदार साळवी यांच्याऐवजी या मतदारसंघातील समस्यांची जाणीव असलेल्या स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी, अशी मागणीदेखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

शिवसेना उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे आदींनी आमदार साळवी यांच्या कार्यपद्धतीवर बोलताना आमदार साळवी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये साळवी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व शिवसैनिकांना सोबत घेत काम करण्याची मानसिकता नसलेले आहेत. संघटनेतील पदांच्या नियुक्‍त्या त्यांच्याच मर्जीतील लोकांना दिल्या जातात. शिवसैनिक आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी आमदारांनी आजवर कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.

तालुकाप्रमुख दळवी व उपजिल्हाप्रमुख राजापकर यांच्या मर्जीतील गावांनाच विकासकामे दिली जातात, असे आरोप केले. विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात येवू नये, अशी आपली भूमिका असून ही भूमिका आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. पक्षनेतृत्व आम्हाला निराश करणार नाही, अशी आम्हाला ठाम खात्री व विश्वास असल्याचेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, विभाग संघटक रवींद्र डोळस, उपसभापती श्रीकांत कांबळे, पंचायत समिती सदस्य अनिल कसबले, सरपंच योगेश पाटोळे, विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये, उपविभागप्रमुख राजेंद्र पालये, सरपंच स्वप्नील शिंदे, तालुका समन्वय अधिकारी निखिल माने, शाखाप्रमुख संतोष लिंगायत, राजेंद्र सुर्वे, सुभाष बाणे, प्रकाश करंबेळे, उपविभागप्रमुख प्रदीप गार्डी, सिद्धेश पांचाळ, युवासेना विभाग अधिकारी रूपेश सुर्वे, राजेंद्र घडशी, भालचंद्र बोडस, विनायक कामत, चंद्रकांत करंबेळे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsainik against MLA Rajan Salavi in Lanja