
रत्नागिरी : पालकमंत्री बदला; सामंतांचा राजीनामा घ्या
चिपळूण - येथे शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिवसैनिकांकडून टार्गेट झाले. या बैठकीत पालकमंत्री बदला आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उत्तर रत्नागिरी भागातील पाच तालुक्यांतून पालकमंत्री बदलाच्या मागणीला बैठकीत जोर धरला होता. या भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद पक्ष नेतृत्वासमोर मांडली. यामुळे शिवसेनेत खळबळ माजली आहे. जिल्ह्यात २६ ते २९ मेदरम्यान शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज बहादूर शेखनाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह खेड-दापोली-मंडणगड गुहागर तालुक्यांचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी तसेच विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी काय काम केले, याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मागील अडीच वर्षांत पालकमंत्री अनिल परब यांनी काय काम केले, याचा खुलासा करावा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात; मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत, असा आरोप करण्यात आला. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटांत वाद लावून निघून गेले. त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत. संघटनेकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्याला नको, अशी मागणी उत्तर रत्नागिरीतील पान ९ वर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केल्यानंतर उर्वरित तालुक्यांतून पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर धरला गेला.
चिपळूणमधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना विधानसभा निवडणुकीत आपण अप्रत्यक्षरीत्या कशा पद्धतीने मदत केली, याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावर्डे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर चिपळूणमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मंत्री सामंत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्री सामंत यांनी शिवसेनेत राहून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून पदाधिकारी अचंबित झाले. तुमच्या मागण्या आम्ही पक्ष नेतृत्वपर्यंत पोहोचवतो, अशी ग्वाही सुनील मोरे आणि शरद बोरकर यांनी दिल्यानंतर पदाधिकारी शांत झाले.
‘शिवसंपर्क’ योगेश कदम यांच्याकडे
दापोली मतदार संघात शिवसंपर्क अभियान राबवण्याची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे, याची घोषणा शरद बोरकर यांनी केली. त्यामुळे सभागृहातच घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. दापोलीमध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि आमदार योगेश कदम यांचे गट आहेत. शिवसंपर्क अभियान नक्की कोण राबवणार, याकडे सर्वांचे लक्ष होते; मात्र नेतृत्वाकडून योगेश कदम यांचे नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली.
Web Title: Shivsena Agresive In Meeting Shivsampark Abhiyan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..