संगमेश्वरात भाजपला गृहीत धरणे शिवसेनेला पडले महागात

संदेश सप्रे
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी २९ हजार मतांनी सदानंद चव्हाण यांचा धुव्वा उडवला.

देवरूख - राष्ट्रवादीचे शेखर निकम मागीलवेळच्या चुका टाळत असताना शिवसेनेने स्वतःच्या पराभवाचा मार्ग आखला, असे चित्र संगमेश्‍वर तालुक्‍यात दिसून आले. प्रमुख नेते प्रचारात उतरूनही म्हणावे तसे वातावरण निर्माण झाले नाहीच शिवाय भाजपला गृहित धरणे शिवसेनेसाठी धोकादायक ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी २९ हजार मतांनी सदानंद चव्हाण यांचा धुव्वा उडवला. हे मताधिक्‍यही अनपेक्षित होते. मतदान झाल्यावर शेखर निकम निवडून येतील मात्र विजयातील फरक ७ ते ८ हजार असेल असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात संगमेश्‍वर तालुक्‍यातूनच निकम यांना १४ हजारांचे भरभरून मताधिक्‍क्‍य मिळाले. शिवसेनेकडून तालुक्‍यात माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने यांच्यावर प्रचाराचा भार होता. दोघाही दिग्गजांच्या जिल्हा परिषद गटात शिवसेना काही हजारांनी मागे आहे.

दापोलीत शिवसेनेच्या या युवा नेतृत्वाचा उदय 

त्यांच्याशिवाय खासदार विनायक राऊत, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रचाराला हजेरी लावली. आमदार जाधवांनी शेखर निकम यांच्यावर सडकून केलेली  टीकाहीसुद्धा निकमांना सहानुभूती मिळवण्यास कारणीभूत ठरली. वास्तविक निकमांनी सत्ताधाऱ्यांशिवाय कुणावरही वैयक्‍तिक टीका केलेली नाही. उलट समोरून येणाऱ्या टिकेला ते सौम्य भाषेत उत्तर देत गेले. याचा फायदा राष्ट्रवादीला झाला.

...यामुळेच मी आता आमदारही; चंद्रकांत जाधव यांची प्रतिक्रिया 

बंडखोरी मागे घेतल्यावर शिवसेनेने भाजपला नको तितके गृहित धरले. भाजपची फारशी साथ शिवसेनेला मिळालेली नाही हेच स्पष्ट होते. शिवसेनेतूनच भाजपमध्ये आलेल्यांना युती मान्य नव्हती. भाजपचा अर्ज मागे आल्यावर नव्या भाजपजनांनी निकम यांचे उघडपणे काम केले. निष्ठावान भाजपवाल्यांनी मात्र युती धर्म पाळला. आणि शिवसेनेबाबत प्रचंड नाराजी असल्याने लोकांना शेखर निकमांशिवाय पर्याय नव्हता. गेली २५ वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संगमेश्‍वर तालुक्‍याला सुरूंग लावण्यात अखेर राष्ट्रवादीला यश आले आहे.

हा पराभव महायुतीचा नाही तर तो शिवसेनेबद्दल जनतेत असलेल्या नाराजीचा आहे. गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या नादात शिवसेनेच्या तळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निर्माण केलेले वातावरण, विद्यमान आमदारांची संपर्कात पडलेली कमतरता आणि शेखर निकमांबद्दल जनतेत असलेली ओढ यातूनच शिवसेनेला हा दारूण पराभव पत्करावा लागला.
- प्रमोद अधटराव,
तालुकाध्यक्ष, भाजप 

उदयनराजेंच्या पराभवावर संभाजीराजे म्हणाले... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena defeated in Sangmeshwar due to nonsupport of BJP