दळवी-कदम वादात सेनेची यादी विलंबाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

दापोली - उमेदवारी अर्ज भरण्यास उद्या (ता.१) सुरवात होत असली तरी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची पूर्ण यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पंचायत समितीची सत्ता सेनेच्या ताब्यात असून, काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत.

दापोली - उमेदवारी अर्ज भरण्यास उद्या (ता.१) सुरवात होत असली तरी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची पूर्ण यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पंचायत समितीची सत्ता सेनेच्या ताब्यात असून, काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत.

दापोली तालुक्‍यात शिवसेनेकडे एकहाती सत्ता होती. माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना गेली पाच वर्षे अंतर्गत विरोध होता. मात्र, पंचवीस वर्षे आमदारकी ताब्यात ठेवणाऱ्या दळवींनी हा विरोध काबूत ठेवला होता. गत विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दळवी विरोधी गटाने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या रूपाने सक्षम पर्याय शोधून सेनेत कार्यरत राहण्यात यश मिळविले. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने युवासेनेचे सदस्य योगेश कदम यांनी दापोली विधानसभा क्षेत्रात सक्रिय होऊन नवखे असूनही दापोलीत युवा उमेदवारांच्या पाठीमागे भक्कम पाठबळ उभे केले. नगरपंचायतीवर सत्ता आणण्यासाठी मेहनत घेतली. मात्र, सेनेला स्वबळावर सत्ता मिळाली नाही. नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी सेनेला काँग्रेसबरोबर भागीदारी करावी लागली. या निवडणुकीपर्यंत सेनेत निष्ठावान आणि बंडखोर असे छुपे गट कार्यरत होते. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दळवींच्या अनुपस्थितीने हे गट प्रथमच खुलेपणाने दापोलीवासीयांना दिसून आले. दापोली मतदारसंघातील कदम यांच्या वाढत्या संपर्काने दळवी गटात अस्वस्थता दिसून येत होती.

याचदरम्यान दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा दापोलीच्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या सर्व अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर नाराज दापोली आणि मंडणगड येथील पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वर भेटून आपली कैफियत पक्षप्रमुखांकडे मांडली. पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार आगामी निवडणुकीचे उमेदवार दिले जातील, असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. दापोली शिवसेनेतील वाढत्या कार्यकर्त्यांच्या संख्येने अनेक गणांमध्ये तीन-चारजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. इच्छुकांच्या मुलाखती होऊन दहा दिवस होऊनही अंतिम यादी जाहीर झालेली नाही. मुलाखती देणारे कार्यकर्ते अंतिम नावाच्या प्रतीक्षेत आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी अंतिम यादी अखेरच्या क्षणी प्रसिद्ध होण्याची शक्‍यता आहे.

बुरोंडी गट, पालगड गणाचा तिढा
पंचायत समितीचा पालगड गण आणि जिल्हा परिषदेचा बुरोंडी गट दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेचा करण्यात आला असून, येथील उमेदवारी आपल्याच गटातील उमेदवाराला मिळाली पाहिजे या अट्टहासाने अंतिम उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्याची शक्‍यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली.

Web Title: shivsena list late by dalvi-kadam dispute