राणेंनी अनेकांशी गद्दारी करून पदे मिळविली; वैभव नाईक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणेंनी अनेकांशी गद्दारी करून पदे मिळविली; वैभव नाईक
राणेंनी अनेकांशी गद्दारी करून पदे मिळविली; वैभव नाईक

राणेंनी अनेकांशी गद्दारी करून पदे मिळविली; वैभव नाईक

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही, बघून घेईन, अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र, नारायण राणे यांनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना उपदेशाचा राणेंना नैतिक अधिकार नाही, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी आज केली..

हेही वाचा: Honey trap : ‘काउंटर इंटेलिजन्स’वर भर देण्याची गरज

येथील विजय भवनमध्ये बोलताना नाईक म्हणाले, ‘‘नारायण राणेंनी सत्तेसाठी सुरुवातीला शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. या कालावधीत राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये आणि कोणाला उपदेशही देऊ नये.’’

हेही वाचा: संजय पांडे यांचे महासंचालकपद जाणार?

नाईक म्‍हणाले, ‘‘भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायण राणेंबरोबर नाहीत हे हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. तसेच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्वीकारत नाहीत. त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्यांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न राणे करत आहेत. भाजपमध्ये दाखल झालेले राणे कुटुंबीय हे भाजपच्या भल्यासाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी दाखल झाले आहे. सत्ता असेल त्या पक्षात प्रवेश करून राणे स्वतः सत्तेचा उपभोग घेऊन आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत हे आता लपून राहिलेले नाही.’’

...तरीही दहशत माजवण्याचा प्रयत्न

राणेंची दहशत सिंधुदुर्गच्या जनतेने याआधीही मोडीत काढली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांना धमकावून राणे पुन्हा जिल्ह्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र जिल्ह्यातील जनता राणेंची दहशत खपवून घेणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता व कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत हे स्पष्ट होईल, असे आमदार नाईक म्हणाले

loading image
go to top