शिवसेना ८० लाखांच्या घोटाळ्यामुळे अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

चिपळूण - शहरातील बाजारपुलाच्या कामात ८० लाखांचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट आर्किटेक्‍ट विलास आघरकर यांनी केला आहे. त्यामुळे पालिकेच्या सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. नगराध्यक्षांनी ५८/२ कलमाचा वापर केला म्हणून आरडाओरड करणारी शिवसेना ८० लाखांच्या घोटाळ्यावर गप्प का? असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे. नगराध्यक्षांना शिवसेना अडचणीत आणू पाहात असताना झालेल्या आरोपाचे टायमिंग महत्त्वाचे मानले जात आहे.

बाजारपुलाचे घेतलेल्या ठेकेदाराला काम न करताच ८० लाखांचे बिले देण्यात आले, असा गौप्यस्फोट पालिकेच्या आर्किटेक्‍ट पॅनलमधील कन्सलटंसी इंजिनिअरिंगचे विलास आघरकर यांनी केला आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघरकर यांचीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेला अडचणीची ठरण्याची शक्‍यता आहे. मागील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. या वेळी शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतले. त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसही सत्ताधारी पक्ष म्हणून ओळखला जातो. शिवसेनेला दोन्हीवेळा सत्तेबाहेर राहावे लागले. 

नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी भुयारी गटार योजनेच्या सर्वेक्षणासाठी ५८/२ कलमाचा वापर केल्यानंतर विरोधी पक्ष किती जागृत आहे हे दाखविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. हा विषय सध्या गाजत असताना आघरकर यांनी बाजारपुलाच्या कामात ८० लाखांचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसमोर नवीन पेच निर्माण होणार आहे. मागील सभागृहाने ६ कोटी ९८ लाख २५ हजार रुपये खर्च करून बाजार पुलाची उभारणी केली. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी बाजार पुलाच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून साडेतीन कोटी रुपये दिले होते. उर्वरित निधी पालिकेच्या फंडातून खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच ठेकेदाराला न झालेल्या कामाचे ८० लाख रुपये पालिकेच्या फंडातून देण्यात आले. नगरध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी आर्थिक भ्रष्टाचार केला नाही. पालिकेचे नुकसानही केले नाही. आपल्या अधिकारात असलेल्या ५८/२ कलमाचा वापर केला. म्हणून सेनेचे नगरसेवक आक्रमक होऊ शकतात. मग मागील सत्ताधाऱ्यांनी ८० लाख कुठे जिरवले. विरोधी पक्षाला यामध्ये विश्‍वासात घेतले गेले का याचा शोध सेनेच्या अनुभवी नगरसेवकांनी का घेतला नाही, असा प्रश्‍न राजकीय क्षेत्रात विचारला जात आहे. 

‘‘बाजारपुलाच्यासंबंधी आर्किटेक्‍ट आघरकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबतची संपूर्ण माहिती मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाकडून घेणार आहे. त्यानंतर शिवसेनेची पुढील भूमिका स्पष्ट करू.’’ 
- शशिकांत मोदी, गटनेता शिवसेना, चिपळूण

Web Title: shivsena problem in scam