
शिवसेनेत धुमसत उत्तरेतील खदखद दक्षिणेतही दिसणार
देवरूख: जिल्हा शिवसेनेत धुमसत असलेल्या असंतोषाची खदखद अखेर उत्तर रत्नागिरीच्या सभेत बाहेर पडली. गेली दोन वर्षे सुरू असलेली अंतर्गत घुसमट या निमित्ताने शिवसैनिकांनी बाहेर काढली असून आता असाच प्रकार दक्षिण रत्नागिरीत होणार का? याकडे लक्ष आहे. २०१९ च्या निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून शिवसेनेचे तत्कालीन आमदार सदानंद चव्हाण यांचा झालेला पराभव हा चर्चेचा विषय होता.
त्यावेळी चव्हाण हे निवडून येणार आणि राज्यात मंत्री होणार, अशी जोरात चर्चा होती; मात्र ही जागा शिवसेनेला गमवावी लागली. यानंतर गेली दोन वर्षे या विषयावर कुठेही चर्चा झाली नाही. त्यामुळे हा विषय थंडावला की काय, असे वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी सावर्डे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान मंत्री उदय सामंत यांनी चव्हाण यांचा पराभव कसा झाला, त्याचे रहस्य फक्त मला आणि निकम यांनाच माहिती आहे, असे जाहीर वक्तव्य केले. यानंतर चिपळूण शिवसेनेतील खदखद सुरू झाली. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अखेर उदय सामंत यांना पत्रकार परिषद घेऊन आपला वक्तव्याचा खुलासा करावा लागला. तरीही शिवसैनिक शांत नव्हते. यामुळे हा सगळा प्रकार कधी बाहेर येतो, याची उत्सुकता होती.
शिवसंपर्क अभियान तयारीच्या बैठकीत याला मुहूर्त मिळाला आणि चिपळुणात त्या वक्तव्याचा स्फोट झाला. याचा रोष पालकमंत्री अनिल परब यांच्यावरही निघाला. यातून शिवसेनेत किती असंतोष होता, हे स्पष्ट झाले. उत्तर रत्नागिरीत झालेल्या या प्रकाराची दक्षिण रत्नागिरीतही पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. रत्नागिरी वगळता संगमेश्वर, लांजा, राजापूरमधील वातावरणही असेच आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी हे ज्येष्ठ असूनही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे साळवी समर्थक प्रचंड नाराज आहेत. आता चिपळूणच्या बैठकीनंतर हा प्रकार दक्षिण रत्नागिरीतही होऊ शकतो, असे वातावरण आहे. यामुळे आगामी काळात ही खदखद दक्षिणेसही बाहेर येणार, अशी जोरदार चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांकडून समन्वयाचा सल्ला
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील आमदार आणि मंत्री यांची बैठक घेतली होती. यात सगळ्यांनी समन्वयाने वागा, असा सल्ला त्यांनी दिला आहे; मात्र याची अंमलबजावणी कशी होते, यावर सारे अवलंबून आहे.
Web Title: Shivsena Sangameshwar Smog North The South
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..