राममंदिर एक जुमलाच होते, हे जनतेला सांगून टाका : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

महाड : अच्छे दिन, अच्छे दिन करत सत्तेवर आलेल्या भाजपने अच्छे दिन प्रमाणेच राममंदिर बांधण्याचे आश्वासनही एक जुमलाच होते हे जनतेला एकदा सांगून टाकावे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाड येथे लगावला. राममंदिरासाठी जमवलेल्या विटांच्या आपल्या सिंहासनासाठी पायऱ्या बनवल्या असा घणाघाती आरोपही यावेळी त्यांनी भाजपवर केला.

महाड येथील भिलारे मैदानावर रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या मतदान केंद्र प्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फूंकण्यात आले. आपल्या संपूर्ण भाषणात ठाकरे यांनी भाजपवरच टिकास्त्र तर सोडले, पण रायगडमध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा उल्लेखही आवर्जून केला. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आ.भरत गोगावले, म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, मिलिंद नार्वेकर, योगेश कदम उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की रायगडातील शिवसैनिकाची एक वेगळी ओळख आहे. येथील शिवसैनिकांपासून इतरांनी प्रेरणा घ्यावी, असे काम गावोगावी करण्याचे आवाहन केले. देश व राज्यात दुष्काळ जरी असला तरी थापांचा सुकाळ सरकारकडे भरपूर आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पिक नसेल पण पुंगी वाजणाऱ्या गाजराचे पिक भरपूर आहे, अशी टिका करत सत्तांध झालेल्या हत्तीला काबूत ठेवण्यासाठी त्यावर बसून त्याला वठणीवर आणण्याचे काम शिवसेना सत्तेत राहून करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुटाबुटात पंचतारांकित हाँटेलमध्ये पर्यावरणाच्या झाडे जगविण्याचे कार्यक्रम करायचे आणि मेट्रोसाठी हजारो झाडे तोडायची असे काम आपल्याला करायचे नाही. समस्येच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवण्याचे काम शिवसैनिकांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. राफेल घोटाळा हा प्रत्येकाला कळला पाहिजे. शिवसेना सत्तेत असली तरी पापात सहभागी नाही हे जनतेला सांगितले गेले पाहिजे. ज्या शब्दावर जनतेने विश्वास ठेवला ती कामे होत नाहीत हे गट प्रमुखानी घरोघरी सांगितले पाहिजे असेही ते म्हणाले. सुभाष देसाई यांनी राफेल घोटाळ्यावर भाष्य केले तर अनंत गीते यांनी रायगडातील सुनील तटकरे आणि जयंत पाटील हि दोन संस्थाने या निवडणूकीत खालसा करु अशी ग्वाही यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com