एस. टी. चा फायदा करणारी शिवशाही प्रवाशांसाठी धोक्याची

सुनील पाटकर
रविवार, 6 मे 2018

शिवशाही बसेस या तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत असल्याने त्या चालवणे सर्वसामान्य चालकाला सहज शक्य नसल्याने एस. टी. च्या चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र खाजगी गाड्यांवरील चालक अप्रशिक्षित असल्याने सातत्याने अपघात होणे, घाटमार्गावर वळणात गाडी व्यवस्थित न वळणे, दरवाजा अडकणे, पिकअप समस्या या घटना वारंवार आहेत.

महाड - एस. टी. महामंडळामध्ये नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बसेस कडे प्रवाशांचा कल वाढत असल्याने शिवशाही एस. टी. साठी फायद्याची असली तरी प्रवाशांसाठी धोक्याची सिध्द होत आहे. 

एस. टी. महामंडळ गेली अनेक वर्ष तोट्याच्या गप्पा मारत असतानाच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही या ए. सी. बसेस दाखल केल्या. या बसेस आणताना चलाखी दाखवत एस.टी.चा मार्ग खाजगीकरणाच्या वाटेवर आणून ठेवला आहे. यातील कांही बसेस या एस. टी. च्या तर बहुसंख्य खाजगी कंपन्यांच्या आहेत. या खाजगी बसेस वर खाजगी चालक व महामंडळाचा वाहक नेमण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 22 गाड्या या खाजगी मालकीच्या आहेत फक्त महाड आगारात देण्यात आलेल्या 6 गाड्या या एस. टी. च्या मालकीच्या आहेत. शिवशाही बसेस या तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत असल्याने त्या चालवणे सर्वसामान्य चालकाला सहज शक्य नसल्याने एस. टी. च्या चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र खाजगी गाड्यांवरील चालक अप्रशिक्षित असल्याने सातत्याने अपघात होणे, घाटमार्गावर वळणात गाडी व्यवस्थित न वळणे, दरवाजा अडकणे, पिकअप समस्या या घटना वारंवार आहेत. बस दुरुस्तीसाठीही खाजगी गॅरेज व मेकॅनिक नेमण्यात आले आहेत. यामुळे या बसेस एस. टी. करिता फायद्याच्या असल्या तरी प्रवाशांची सुरक्षा मात्र धोक्यात आली आहे.

महाड आगारात असलेल्या खाजगी बसेसना पुणे मार्ग देण्यात आला आहे. या मार्गावर महाड, खेड व अन्य आगाराच्या बस अनेकदा अडकून पडलेल्या आहे. अनेकवेळा शिवशाही बसचा दरवाजा न लागल्याने महाड आगारात बस उभी ठेवण्याची पाळी आली आहे. कांही वेळेस ए.सी.देखील बंद पडला आहे. महाड पुणे मार्गावर मागील आठवड्यात स्पीड लॉक होण्याची घटना घडली. या सगळ्या तांत्रिक चुकांमुळे आणि अकुशल कामगारांच्या भरतीने प्रवाशांना याच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. महाड शिवाजी चौक मधील सर्कलला या बसने शुक्रवारी धडक दिली. अशाचप्रकारे शिवशाही बसची मागील काच देखील पडण्याची घटना महाड पुणे मार्गावरच घडली होती. शिवाय खाजगी गाड्यांवरील चालक आणि एस. टी. चा वाहक यांच्यात समन्वय होत नसल्याने कायम तक्रारी दाखल होत आहेत. 

महाड मधून तीन बोरीवली, दोन मुंबई, एक नवीन गाडी याच मार्गावर सोडण्यात येणार आहे. शिवशाही बसेस मुळे एस. टी. चे उत्पन्न वाढले आहे. एकूण उत्पन्नापैकी 10 टक्के वाढ ही शिवशाही बसेसमुळे झाली आहे. अधिकारी, राजकीय नेते, व्यापारी यांचा कल देखील या बसेसकडे वाढला आहे. 

वाढत्या उष्म्यामुळे व आरामदायी प्रवासामुळे प्रवासी शिवशाहीनी जाणेच पसंत करत असले तरीही ज्या सुखकर प्रवासासाठी प्रवासी एस. टी. चा मार्ग अवलंबतो तो प्रवास या शिवशाहीमुळे धोक्यात आला आहे. - मनोहर काळे (प्रवासी)

महाड आगारात एस. टी. च्या मालकीच्या गाड्यांबाबत अद्याप कोणतीच तक्रार दाखल नाही. महाड पुणे मार्गावर असलेल्या खाजगी ठेकेदाराच्या गाड्यांबाबत सातत्याने तक्रारी वाढल्या शिवाय प्रवाशांना त्रास झाला आहे. यामुळे या कंपनीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात आला आहे - ए. पी. कुलकर्णी (आगार व्यवस्थापक महाड)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Shivshahi is a danger to passengers