...तर गणराय कसे प्रसन्न होतील - श्रीगुरु बालाजी तांबे

...तर गणराय कसे प्रसन्न होतील - श्रीगुरु बालाजी तांबे

रत्नागिरी - श्री गणेशाची आराधना आणि उपासना यामध्ये काळानुरूप बदल केला पाहिजे. उत्सव सार्वजनिक करताना यातील अपप्रकार काढून टाकायलाच हवेत. हे उत्सव केवळ करमणुकीसाठी किंवा उत्सव करण्याच्या समाधानासाठी झाले, तर गणराय आपल्यावर कसे प्रसन्न होतील, असा सवाल करून उत्सव हे देवा गजानना तू आमच्यावर प्रसन्न हो, असे त्यांना सांगता येण्यासाठी व्हावेत, असे प्रतिपादन श्रीगुरु बालाजी तांबे यांनी केले. 

चिंद्रवली-खेडकुळी येथील माघी गणेशोत्सवानिमित्ताने आले असता त्यांनी गणेशरूप नेमके काय आहे, हे उलगडून सांगितले. श्री गुरु म्हणाले, ""आधुनिक काळाप्रमाणे बोलायचे, तर श्री गणेश रूपाचा अभ्यास करताना व तो समजावून घेताना अथर्वशीर्ष "डी कोड' केले आहे. त्याचा गूढार्थही समजावून सांगितला आहे. तो आणि तोच अर्थ आहे, असा दावा नाही, परंतु बऱ्याच गोष्टी समजावण्यासाठी जय देवा गजानना आता व्हा प्रसन्न हे पुस्तकच लिहिले आहे. गणपती आराधनेने मेंदू स्थिर होतो. अथर्वशीर्ष म्हणजे मस्तक न हलणे नव्हे, तर मेंदू स्थिर होणे. उत्तम स्मरणशक्ती प्राप्त होणे, त्यासाठी अथर्वशीर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढत्या वयातील मेंदूचे विकार सध्या लहान वयातही होऊ लागले आहेत. मेंदूच्या 8 भागांतून वेगवेगळे विचार, आज्ञा दिल्या जातात. आठाला महत्त्व असल्याने अष्टांग आयुर्वेद तयार झाला. अस्थिर काय असते तर मन, ते स्थिर करणे आवश्‍यक आहे. ब्रह्म म्हणजे मेंदूसाठी वापरलेले अभिनाम आहे. त्याला स्थिर करण्यासाठी म्हणजेच मनाला स्थिर करण्यासाठी अथर्वशीर्ष आहे. 

तंत्रज्ञानाच्या भाषेत अथर्वशीर्ष हा एक प्रोग्रॅम आहे. त्यावरून स्मृतीवर नियंत्रण करता येईल. स्मृती मेंदूत म्हणजे मनात साठलेल्या असतात. त्या अस्थिर करतात. म्हणून त्यांच्यावर नियंत्रण आणायचे. मनाला स्थिर केले तर एकत्व साधता येईल. आपल्यासमोरील व्यक्ती आणि आपण एकच आहोत, हे लक्षात आले, तर स्थिर बुद्धीने एकत्व साधता येईल. अथर्वशीर्ष त्यासाठी आवश्‍यक आहे. त्याचे फक्त पाठांतर उपयोगी नाही, तर त्यातील स्वररचना, गेयता आणि लय, शब्दशुद्धता महत्त्वाची आहे. स्तोत्र असोत वा ऋचा त्यांना अंगभूत स्वररचना आहे. आपल्या शरीराचे आठ भाग केले, तर त्या भागांवर वेगवेगळ्या गणेशांचे आधिपत्य चालते. त्यानुसार उपासना केल्यास परमात्म्याच्या अस्तित्वापर्यंत पोचता येते, असेही श्रीगुरुंनी सांगितले. 

अर्थ समजून म्हणा 
अथर्वशीर्ष असो वा गणेशस्तोत्र त्याचा अर्थ प्रत्येकाने वकूबाप्रमाणे लावला. सात्त्विक वृत्ती ठेवून ब्रह्मोपासना करणाऱ्या 8 व्यक्तींनी एकत्र अथर्वशीर्ष म्हटले, तर ते सूर्याप्रमाणे तेजस्वी होतात. या ऋचेचा विचार केला तर मेंदूला ब्रह्म का म्हटले आहे, याचा बोध होतो. मेंदूचा डावा, उजवा भाग करून त्याचे उभे, आडवे भाग केले, तर आठ विभाग होतात. त्याची कार्यपद्धती बिघडली सारे बिघडते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित काम केले तरच शरीर नीट चालते. 

स्मरणशक्तीसाठी अथर्वशीर्ष 
विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीसाठी आणि मन स्थिर होण्यासाठी अथर्वशीर्षाचा अत्यंत चांगला उपयोग होतो. याचा पडताळाही अनेकांनी घेतला आहे. ते नेमकेपणाने कसे म्हणायचे, हे काही स्वयंसेवकांना शिकवता येईल. त्यांनी कार्ला येथे यावे आणि शिकावे. तेथे आठवड्यातून तीन दिवस संस्कृतचेही क्‍लास असतात. ते स्वयंसेवक प्रशिक्षित झाले की, अनेक जणांना ते नेमकेपणाने उपासना कशी करायची, हे शिकवू शकतात, असे श्रीगुरू म्हणाले. 

सोमचा बोलबाला 
"सोम-कम्युनिकेशन विथ द सेल' असे पुस्तक श्रीगुरूंनी इंग्रजीतून लिहिले आहे. यातून आरोग्य, संपत्ती, आत्मसमाधान आणि तेज या चारांचा विचार केला आहे. हे पुस्तक जर्मन भाषेतूनही निघाले आहे. सेरेब्रल स्पायलर फ्लूइडचाही विचार या सोममध्ये केला आहे. रॅंडम हाऊस पब्लिकेशन या जगप्रसिद्ध संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले. त्याच्या पहिल्या तीन महिन्यांत तीन हजार प्रती संपल्या. पुस्तक छापण्याआधी त्यातील विचारांचा अभ्यास केला. ताडून पाहिले आणि मग पुस्तक प्रकाशित केले. आता तर गर्भसंस्कार हे पुस्तकही जर्मन भाषेत प्रकाशित होणार असल्याचे श्रीगुरूंनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com