शुकनदीचे पात्र कोरडे पडल्याने वैभववाडीत पाणी टंचाई

शुकनदीचे पात्र कोरडे पडल्याने वैभववाडीत पाणी टंचाई

वैभववाडी - अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या शुकनदीचे पात्र एप्रिलच्या अखेरीस कोरडे पडले आहे. या नदीपात्रातील मोठ्या डोहांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे मेमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेकडो एकर ऊस शेती संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कडक उन्हाळा सुरू झाला आहे. तापमानात प्रचंड वाढ झाली असून अंगाची लाहीलाही होत आहे. याचा एकूणच परिणाम पाण्याच्या पातळीवर झाला आहे. नदीनाले, विहिरींची पाणी पातळी खालावत चालली आहे.

तालुक्‍यातील सांगुळवाडी, वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर, उंबर्डे, नापणे, तिथवली यांसह विविध गावांची जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुकनदीचे पात्र अक्षरक्षः कोरडे पडले आहे. या नदीच्या पाण्यामुळे नऊ गावांतील विहिरींच्या पाण्याची पातळी चांगली राखली जाते; परंतु त्याच नदीचे पात्र आटल्यामुळे अवलंबित गावांमध्ये भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

एकीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत असताना दुसरीकडे शुकनदीवर अवलंबून असलेली ऊसशेतीही संकटात सापडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. वाढलेल्या प्रचंड उष्म्यामुळे शेतीला भरपुर पाण्याची गरज भासते; मात्र नदीतच पाणी नसल्यामुळे शेतकरी कसाबसा शेतीला पाणीपुरवठा करताना दिसत आहे.

नापणे, उंबर्डे कातकरवाडी या परिसरात नदी मोठे डोह आहेत. या डोहामध्येच शेतीला पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप बसविण्यात आले आहेत. या डोहांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. ऊसशेतीला आता पाणी कमी पडले तर पिकाला ताण बसुन त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत. 

खांबलवाडी धरणाचा पर्याय 
शुकनदीवर अवलंबित गावे आणि ऊसशेती पाणीटंचाईपासून वाचवायची असेल तर खांबलवाडी धरणाचे पाणी तत्काळ शुकनदीत सोडणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे हे पाणी शुकनदीत सोडून शेतकऱ्यांची होणारी हानी टाळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

शुकनदीच्या पाणीपातळीची माहिती घेऊन नापणे किंवा त्या परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासल्यास खांबलवाडी धरणाचे पाणी शुकनदीला सोडले जाईल. 
- नंदकुमार साळवी,
शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर फोंडाघाट. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com